श्री तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान अलंकारावर डल्ला मारणार्यांवर गुन्हे दाखल होणार; जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची माहिती

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान अलंकारावर डल्ला मारणार्‍यांवर आता गुन्हे दाखल होणार आहेत. या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तहसीलदारांना दिले आहेत. यामध्ये महंत, सेवेकरी व प्रशासकीय अधिकार्‍यांचा समावेश असून यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.

मागील वर्षापासून श्री तुळजाभवानी देवीच्या पुरातन दागिन्यांची मोजदाद झाली नव्हती. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी उमरगा येथील उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखालील अलंकाराची तपासणी करण्यासाठी 16 सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीने मागील दोन महिन्यांपूर्वी अहवाल सादर केला होता. यात देवीच्या नित्योपचारासाठीच वापरण्यात येणारे सोन्या-चांदीचे दागिने, हिरे, मोती, माणिक, पाचू असे अनेक दुर्मिळ अलंकार मंदिराच्या तिजोरीतून गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.

त्यानंतर अहवालाच्या संदर्भाने तुळजाभवानी देवीचे जे दागिने गहाळ होते, त्याची जवाबदारी निश्चित करण्यासाठी अलंकारनिहाय, व्यक्तीनिहाय किंवा ज्यांच्याकडे हे दागिने होते त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार जे अलंकार गहाळ आहेत, त्यानुसार जवाबदार व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली आहे.