पुणेकरांना रोनाल्डोचा खेळ बघण्याची संधी? बालेवाडी स्टेडियमवर सामना होण्याची शक्यता

पुणेकर फुटबॉलप्रेमींना सुपरस्टार खेळाडू ख्रिस्टियानो रोनाल्डोला ‘याचि देही याचि डोळा’ खेळताना बघण्याची संधी मिळू शकते. एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रोनाल्डोचा सामना होण्याची शक्यता आहे.

एएफसी चॅम्पियन्स लीगच्या प्ले ऑफमध्ये रोनाल्डोच्या एल नासर फुटबॉल क्लबने दुबईच्या शबाब अल अहली क्लबचा 4-2 गोल फरकाने पराभव – केला. या विजयाबरोबरच अल नासरने 2023-2024 एएफसी चॅम्पियन्स लीगमधील आपला प्रवेश निश्चित केला आहे. त्यांचा सामना मुंबई सिटी एफसीविरुद्ध पुण्यात होण्याची शक्यता असल्याने आता पुणेकरांना रोनाल्डाचा खेळ बघण्याची उत्कंठता लागली आहे.

अल नासर क्लबच्या अँडरसनने सुरुवातीलाच पहिला गोल केला होता. मात्र, सौदीच्या तगड्या संघाला मोठा धक्का बसला. घसानीने 18 आणि 46 व्या मिनिटाला दोन गोल करत 2-1 अशी आघाडी घेतली. पिछाडीवर पडलेल्या नासरसाठी अखेर 88 व्या मिनिटाला सुल्तान बिन अब्दुल्ला धावून आला. त्याने आपल्या क्लबसाठी बरोबरीचा गोल केला. यानंतर टालिस्का आणि मार्सेलो ब्रोझोविक यांनी एक्स्ट्रा टाईममध्ये गोल करत अल नासरला दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयानंतर अल नासर क्लब एएफसी चॅम्पियन्स लीग 2023-2024 च्या हंगामासाठी पात्र झाला आहे. त्यांचा संघ वेस्ट झोनच्या पॉट-4 मध्ये असण्याची शक्यता आहे. या पॉटमध्ये गतविजेते अल अिन एफसी क्लबदेखील आहे.

जर सर्व गोष्टी जुळून आल्या तर रोनाल्डो हा मुंबई सिटी एफसी क्लबविरुद्धदेखील खेळू शकतो. हा सामना पुण्यामध्ये बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होण्याची शक्यता आहे. मुंबई सिटी एफसी क्लब हा चॅम्पियन्स लीगमधील हिंदुस्थानचा एकमेव फुटबॉल क्लब होय. पुण्यातील बालेवाडी हे त्यांचे होम ग्राऊंड आहे. जर ड्रॉमध्ये दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आले, तर नक्कीच रोनाल्डो मुंबई सिटी एफसीविरुद्ध खेळेल.