फ्रान्सकडून 26 राफेल, 3 पाणबुड्या खरेदीच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी; 90 हजार कोटींचा करार

हिंदुस्थानी नौदलासाठी फ्रान्सकडून 26 राफेल लढाऊ विमाने आणि तीन स्कॉर्पिन श्रेणीच्या पाणबुड्या खरेदी करण्याच्या योजनेला संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी मंजुरी दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि तिन्ही सेनेचे प्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित असलेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या (डीएसी) बैठकीमध्ये या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने संरक्षण अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे हे वृत्त दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी फ्रान्सला रवाना झाले. नरेंद्र मोदी यांच्या या दोन दिवसीय दौऱ्यावेळी ‘डीएसी’च्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेल्या संरक्षण सौद्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. फ्रान्सकडून 26 राफेल लढाऊ विमाने आणि तीन स्कॉर्पिन श्रेणीच्या पाणबुड्या खरेदीसाठी हिंदुस्थान 90 हजार कोटींहून अधिक रक्कम मोजणार आहे.

डीएसीच्या प्रस्तावानुसार, हिंदुस्थानी नौदलाला चार ट्रेनर विमानांसह 22 सिंगल सीटेड राफेल मरीन विमाने मिळतील. चीन आणि पाकिस्तानसारखे खोडसळ देश शेजारी असल्याने हिंदुस्थानला कायम सतर्क रहावे लागते. त्यामुळे देसातील सुरक्षेची आव्हाने लक्षात घेतला नौदलाने ही लढाऊ विमाने आणि पाणबुड्या तातडीने घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला. त्यानुसार आज डीएसीच्या बैठकीमध्ये यास मंजुरी देण्यात आली.

आयएनएस विक्रमादित्य आणि विक्रांतला विमानवाहू युद्धनौकांवर सध्या मिग-29 विमानं तैनात आहेत. मात्र या युद्धनौकांना आत्याधुनिक राफेल विमानांची गरज आहे. तसेच नौदलाने तीन स्कॉर्पियन पाणबुड्यांचीही मागणी केलेली आहे. तीन स्कॉर्पिन-क्लास पाणबुड्या नौदलाकडून प्रकल्प 75 चा भाग म्हणून रिपीट क्लॉज अंतर्गत अधिग्रहित केल्या जातील. ज्या मुंबईतील माझगांव डॉकयार्ड्स लिमिटेडमध्ये तयार करण्यात येतील.

राफेलची वैशिष्ट्ये

  • राफेल सगळ्याच हवामानात वापरता येणार असल्यामुळे सगळ्याच हवाई मोहिमांत ते वापरले जाऊ शकते.
  • मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणून ओळखले जाणारे हे विमान एका मिनिटात 60 हजार फुटांपर्यंत जाऊ शकते. त्याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.
  • राफेलची मारक क्षमता 3 हजार 700 किलोमीटरपर्यंत आहे तर त्याच्यावर असलेल्या स्काल्प क्षेपणास्त्राची मारक क्षमता 300 किलोमीटर आहे.
  • वेग 2,223 किलोमीटर प्रतितास आहे.
  • अँटी शिप हल्ल्यापासून ते अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉग्न रेंज मिसाईल हल्ल्यातही अव्वल आहे.
  • 24 हजार 500 किलोमीटरपर्यंत वजन घेऊन जाऊ शकते.