कोरोनाची लागण झालेल्या अभिनेत्याचे निधन

दाक्षिणात्य अभिनेते आणि DMDK पक्षाचे प्रमुख कॅप्टन विजयकांत यांचे निधन झाले आहे. विजयकांत यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विजयकांत यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते.

विजयकांत यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पक्षातर्फे सांगण्यात आले होते की नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विजयकांत यांची प्रकृतीची चिंता करण्याची गरज नाही असे मंगळवारी सांगण्यात आले होते. बुधवारी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले होते. यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले. एमआयओटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. ‘कॅप्टन विजयकांत न्यूमोनियामुळे अॅडमिट झाल्यानंतर व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही, 28 डिसेंबर 2023 रोजी सकाळी त्यांचे निधन झाले.’ असे रुग्णालयाने जारी केलेल्या वैद्यकीय वार्तापत्रात सांगितले आहे.

विजयकांत यांना गेले काही महिने श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांना नोव्हेंबर महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डिसेंबर महिन्यात ते रुग्णालयातून घरी परतले होते. 154 चित्रपटांमध्ये काम केलेल्या विजयकांत यांचे काही चित्रपट चांगलेच गाजले होते. तमिळ चित्रपटसृष्टीत बऱ्यापैकी यश मिळाल्यानंतर त्यांनी राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला होता. देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम नावाच्या पक्षाची त्यांनी स्थापना केली होती. विरुधाचलम आणि ऋषिवंद्यम या मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. 2011 ते 2016 या काळात ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले होते.