ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला मुस्लिम देश कंगाल झाला, संपूर्ण शहर युएईला विकण्याचा निर्णय

पाकिस्तानप्रमाणेच आणखी एक मुस्लिम राष्ट्र कंगाल झाले आहे. कंगालीतून बाहेर येण्यासाठी या राष्ट्राने त्यांचे एक शहर दुसऱ्या राष्ट्राला विकण्याचा निर्णय घेतला आहे. या देशाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असून या देशाचे नाव इजिप्त आहे. इजिप्तने ‘रास अल हिकमा ‘हे शहर संयुक्त अरब अमिरातीला विकण्याचा निर्णय घेताल आहे.

इजिप्तला या शहराच्या बदल्यात 22 अब्ज डॉलर्स मिळणार आहेत. हे शहर नितांत सुंदर असून हे शहर तिथल्या अप्रतिम समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या शहराला इजिप्तवासी ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ असे म्हणतात. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांनी हे शहर विकण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या या निर्णयाविरोधात इजिप्तमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत.

गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या इजिप्तला परकीय चलनाची नितांत गरज आहे आणि त्यामुळेच रास अल हिकमा हे शहर संयुक्त अरब अमिरातीच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे इजिप्तच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

गुरुवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेचे एक पथक इजिप्तमध्ये आले होते. या पथकाने इजिप्तला आर्थिक मदत देण्याबाबत विस्ताराने चर्चा केली. कर्जाच्या स्वरुपातील ही मदत 10 अब्ज कोटींची असू शकते असा अंदाज आहे. रास अल हकिमाबाबत बोलताना इजिप्तच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की या शहराच्या विकासासाठी 22 अब्ज डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. या शहरासाठी इतर राष्ट्रांकडूनही इजिप्तला मागणी घातली होती. मात्र हे शहर संयुक्त अरब अमिरातीलाच देण्याचा अखेर निर्णय घेण्यात आला. संयुक्त अरब अमिरातीमधील गुंतवणूकदार या प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करतील या शहराचा विकास करतील आणि व्यवस्थापनही सांभाळतील. या अधिकाऱ्याने सांगितले की या कराराची बोलणी पूर्ण झाली असून करारावर लवकरच स्वाक्षरी होईल.

इजिप्त सरकारने घेतलेल्या या निर्णयाला तिथल्या नागरिकांनी कडाडून विरोध करण्यास सुरुवात केली आहे. रास अल हिकमा शहर हे ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ असून आपण राष्ट्राध्यक्ष सिसी यांच्या या निर्णयाचे अजिबात समर्थन करणार नाही असे अनेक नागरिकांनी म्हटले आहे.