पहाटेचा, दुपारचा शपथविधी, आता रात्री कोणता कार्यक्रम…, राजेंद्र पवारांचा अजित पवारांना टोला

लोकसभा निवडणुकांमुळे बारामती मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला आहे. या मतदारसंघात मंगळवारी मतदान होत आहे. त्याआधी या मतदारसंघात प्रचार शिगेला पोहचला आहे. अजित पवार यांना त्यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनी प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. तर आता राजेंद्र पवार यांनीही अजित पवार यांना टोला लगावला आहे. त्यामुळे पुनेहा एकदा या मतदारसंघातकडे लक्ष वेधले जात आहे. या मतदारसंघात प्रतिष्ठेची आणि चुरशीची लढत होत आहे.

अजित पवार यांनी धरणाबाबतचा उल्लेख केला आणि आमची मान खाली गेली. अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी केला आणि आमची मान खाली गेली. त्यानंतर दुपारचा शपथविधी केला आणि आमची मान खाली गेली. आता रात्रीचा कोणता कार्यक्रम करणार आहेत माहित नाही, अशा शब्दात राजेंद्र पवार यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. राजेंद्र पवार हे आमदार रोहित पवार यांचे वडील आहेत. तर अजित पवार यांचे भाऊ आहेत.

बारामतीच्या विकासात आपला मोठा वाटा असल्याचे अजित पवार सांगत आहेत. अजित पवारांनी केलेल्या या दाव्याला उत्तर देताना बारामतीच्या विकासात सर्वच पवार कुटुंबाचा वाटा असल्याचे राजेंद्र पवार म्हणाले. सर्वच पवार कुटुंबियांनी येथे काम केले आहे. 1940 पासून माझ्या आजीने या भागात काम केले. आमच्या घरात सामाजिक आणि राजकीय वातावरण होते. रोहित पवारांना अटक झाली तरी आपण शरद पवारांची साथ सोडणार नाही, असेही राजेंद्र पवारांनी स्पष्ट केले आहे.

अजित पवार यांनी धरणाबाबत वक्तव्य केले तेव्हा आमची मान खाली गेली, पहाटेचा शपथ विधी झाला, दुपारचा शपथविधी झाला तेव्हा आमची मन खाली गेली. आता रात्रीचा एखादा कार्यक्रम करावा म्हणजे झाले, असा टोलाही राजेंद्र पवार यांनी लागवला. मिशा ठेवायच्या की नाही त्यांचा विषय आहे. अजित पवारांना कधी घरातून विरोध झाला नाही. अजित पवार म्हणतात पावसाळ्यात छत्र्या उगवतात. त्यांना माहीत नाही आम्ही सगळ्या सीझनमध्ये आम्ही इथेच असतो. अजित पवार म्हणतात ते मनाला लागत नाही. त्यांची दमदाटी करणे हा स्वभावच आहे. ते आवाजाचा दुरुपयोग करतात. आज काल धमकावले की उपयोग होतो असे भाजपचे धोरण आहे, तेच त्यांनी केले, असेही राजेंद्र पवार म्हणाले.