नगरमधील घटनेनंतर स्ट्राँगरूमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; शिवसेनेचे निवडणूक आयोगाला खरमरीत पत्र

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व EVM आणि VVPAP हे स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आले आहेत. आणि आता सर्वांचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे आहे. पण नगर दक्षिण मतदारसंघात EVM ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एक इसम शरटरपर्यंत गेला आणि त्याने सीसीटीव्हीमध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने सतर्क असलेल्या शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्ट्राँगरूमच्या सुरक्षेवरून थेट राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र लिहिले आहे.

राज्यात काही ठिकाणी स्ट्राँगरूममध्ये तांत्रिक दोष दुरुस्त करण्याच्या नावाखाली तंत्रज्ञ इतर प्रवेशद्वाराने सुरक्षा भेदून प्रवेश करत असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. याबाबतीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) उमेदवार निलेश लंके आणि आमच्या पक्षाचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे, असे शिवसेनेने पत्रात म्हटले आहे.

मतदानातील गोंधळाची मुख्य सचिवांमार्फत चौकशी; उद्धव ठाकरे यांच्या आरोपांनंतर सरकारची पळापळ

‘मुक्त आणि पारदर्शक निवडणुका’ या निवडणूक आयोगाच्या उद्दिष्टानुसार अशा प्रकारच्या घटना घडणे हे निवडणूक आयोगास निश्चितच भूषणावह नाही. अशा प्रकारच्या घटना घडलेल्या ठिकाणी संबंधित निवडणूक तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांवर त्वरीत योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने द्यावेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

उद्धव ठाकरे यांचा संताप; जिथे शिवसेनेचे मतदान तिथे मुद्दाम दिरंगाई!

तसेच दुर्दैवाने स्ट्राँगरूममध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास सदर प्रकाराची कल्पना सर्व उमेदवार आणि त्यांच्या मुख्य निवडणूक प्रतिनिधींना देऊन त्यांच्या उपस्थितीतच तंत्रज्ञांना स्ट्राँग रूममध्ये प्रवेश द्यावा. निवडणूक आयोगाने सदर बाबींची तातडीने गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे पत्र शिवसेनेने निवडणूक आयोगाला लिहिले आहे.