Pune Porsche accident – बिल्डरने गाडीचा चालक बदलण्याचा केला प्रयत्न, कठोर कारवाई होणार

लाडक्या मुलाने बेदरकारपणे पोर्शे गाडी चालवून दोघांचा जीव घेतल्याची माहिती कळताच वडिलांनी येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याठिकाणी त्याने गाडीचा चालक मुलगा नसून, ड्रायव्हर असल्याचे सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, व्हायरल झालेले व्हिडिओ आणि फुटेजच्या आधारे पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरूद्ध गुन्हा दाखल केला.

कल्याणीनगर परिसरात अल्पवयीनाने बेदरकारपणे पोर्शे कार चालवून तरूणीसह दोघांचा जीव घेतल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत असून, मुलाला वाचविण्यासाठी बिल्डर विशाल अगरवाल याने नाना तर्‍हेने प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रकरणात आमदार सुनील टिंगरेचा हस्तक्षेप, स्थानिक पोलिसांवरील दबाव, राजकीय पदाधिकार्‍यांकडून फोनाफोना केली. त्यासोबत अपघातावेळी पोर्शे कार मुलाने नाही तर ड्रायव्हरने चालविल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षदर्शी नागरिक, व्हिडिओ, फोटो, सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी मुलाविरूद्ध गुन्हा दाखल केला.

आरोपी गाडी चालवत नव्हता, असे भासवण्याचा प्रयत्न झाला, मात्र तपासात तसे काही आढळून आले नाही. गाडीतून चौघे जण प्रवास करीत होती. अल्पवयीन मुलगा गाडी चालवित होता. तर चालक आणि दोन मित्र त्याच्यासोबत वाहनात बसले होते. त्याआधी झालेल्या पार्टीत 11 मित्र उपस्थित होते. अपघातावेळी चालक पोर्शे कार चालवत होता, अल्पवयीन आरोपीसह बापाचाही ‘सलमान पॅटर्न’चा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपीने जामीन मिळाल्यानंतर केलेल्या कथित रॅप साँगचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र प्राथमिक चौकशीत तो व्हिडिओ त्या मुलांनी तयार केला नसल्याचे दिसून आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

अपघाताची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

मुलगा अल्पवयीन असतानाही गाडी चालविण्यास दिल्याप्रकरणी पोलिसांनी बिल्डर विशाल अगवरवाल विरूद्ध गुन्हा दाखल करून त्यालाही अटक केली आहे. दरम्यान, दिवसेंदिवस अपघात प्रकरणाची व्याप्ती वाढत असून, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर याची दखल घेण्यात आली आहे. मस्तवाल अल्पवयीन मुलाचा बेदरकारपणा दोघा होतकरू अभियंता तरूण-तरूणीवर काळाचा घाला बनून गेला. त्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त लाट निर्माण झाली असून, अगरवालविरूद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.