मोदींच्या काळात ईडीच्या 95 टक्के धाडी विरोधकांवर

2014 ते 2019 अशा नऊ वर्षात ईडीने देशभरात मोठय़ा प्रमाणात धाडी मारल्या आहेत. काही नेते ईडीच्या रडारवर असून काही नेत्यांची चौकशी केली जात आहे. गेल्या 9 वर्षात अनेक नेत्यांना अटक करून कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये 95 टक्के विरोधी पक्षांतील नेत्याचा समावेश आहे. भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षांवर ईडीची कृपादृष्टी दिसली आहे. गेल्या 9 वर्षातील कारवाईतील टक्केवारी फक्त 6 टक्के इतकी आहे. त्यातही भाजपचा टक्का खूप कमी आहे.

एका रिपोर्टच्या माहितीनुसार, 2014 पासून आतापर्यंत ईडीने जवळपास 122 नेत्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांवर कारवाई केली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त 24 काँग्रेस नेत्यांवर ईडीने कारवाई केली आहे. यात सोनिया गांधी, राहुल गांधी, पी. चिदंबरम, डीके शिवकुमार, मल्लिकार्जुन खरगे, सचिन पायलट, प्रियांका गांधी, रणदीप सुरजेवाला, त्रिवेद्रम स्वामीनाथन, मनीष तिवारी, शशी थरूर, पीएल पुनिया, आनंद शर्मा, मुकुल वासनिक यांच्या नावाचा समावेश आहे.

काँग्रेस पक्षानंतर सर्वात जास्त तृणमूल काँग्रेसचे नेते ईडीच्या रडारवर आहेत. यात ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, पार्थ चॅटर्जी, सुवेंदु अधिकारी, फिरहाद हकीम, मुकुल रॉय यांच्यासह 19 नेत्यांचा समावेश आहे.

लालू प्रसाद यादव यांच्यासह राष्ट्रीय जनता दलाचे 5 नेते, बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्यासह सपाचे 5 नेते ईडीच्या रडारवर आहेत. याशिवाय आम आदमी पार्टीचे मनीष सिसोदिया, संजय सिंह, सत्येंद्र जैन, तेलुगु देसम पार्टीचे पाच नेते, डीएमकेचे एम. के. स्टॅलिन, दयानिधी मारन, इंडियन नॅशनल लोक दलाचे ओम प्रकाश चौटाला यांच्यासह 3 नेते, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते व मुख्यमंत्री हेमंत सोरेन, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) चे पिनाराई विजयन, तेलंगणा राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राक, नॅशनल काँग्रेसचे दोन नेते, पीडीपीचे दोन नेते, अन्नाद्रमुकचे दोन नेते, सुभासपा आणि टीआरएसचे प्रत्येकी एक-एक नेते ईडीच्या रडारवर आहेत. तसेच दोन अपक्ष नेतेही ईडीच्या रडारवर आहेत.

काँग्रेस – 24, तृणमूल काँग्रेस – 19, राष्ट्रवादी – 11, शिवसेना – 8, भाजप-मित्रपक्ष – 6, द्रकिड मुन्नेत्र कळघम – 6, बिजू जनता दल – 6, राष्ट्रीय जनता दल – 5, बहुजन समाजवादी पार्टी  – 5, समाजवादी पार्टी – 5, तेलुगु देसम पार्टी – 5, आम आदमी पार्टी – 4, नॅशनल कॉन्फ्रेंस पार्टी -2, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी – 2, अपक्ष – 2

प. बंगाल, तामीळनाडू, तेलंगणात ईडीचे छापे

इडीने गुरुवारी ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील मंत्री रथीन घोष यांच्या निवासस्थानावर आणि कोलकाता व उत्तर 24 परगणा जिह्यातील त्यांच्याशी संबंधित 12 ठिकाणांवर छापे टाकले. त्याच वेळी ईडीने उत्तर 24 परगणा जिह्यातील टिटागड नगरपालिकेचे माजी अध्यक्ष प्रशांत चौधरी यांच्या निवासस्थानीही छापा घातला. चेन्नई येथील द्रमुक खासदार एस जगतरक्षक यांच्याशी संबंधित 40हून अधिक ठिकाणी झडती घेतली. हैदराबाद येथे बीआरएस आमदार मगंती गोपीनाथ यांच्यावर कारवाई केली.