भाजपनेच शिवसेनेसोबतची युती तोडली होती, मोदी असत्य बोलतायत; एकनाथ खडसेंचे संतप्त उद्गार

शिवसेनेने भाजपची साथ सोडली असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यांचं हे विधान अर्धसत्य नाही तर पूर्ण असत्य असल्याचे एकेकाळी भाजपमध्ये असलेल्या एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. शिवसेना भाजप युती ही भाजपनेच मोडली असे त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी प्रदेशाध्यक्ष होते. असे असतानाही हा निर्णय उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली होती असे खडसे यांनी सांगितले. शिवसेनेशी युती तोडण्याचा निर्णय हा भाजपने एकमुखाने घेतला होता असे ते म्हणाले.

खडसे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, फडणवीस हे त्यावेळी भाजपाध्यक्ष होते. त्यांनी युती तोडण्याची घोषणा करायला हवी होती. त्यांनी ही जबाबदारी माझ्याकडे सोपवली. मी उद्धव ठाकरेंना फोन करून सांगितलं होतं की आपली युती तुटली. खडसे यांच्याप्रमाणेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही बुधवारी सकाळी पंतप्रधान हे खोटं बोलत असल्याचं सांगितलं होतं. “शिवसेनेची साथ कोणी आणि का सोडली हे देशाने पाहिलं आहे. शिवसेना त्यानंतर स्वतंत्रपणे निवडणुका लढली. आपली युती तुटली, आपण वेगळे झाले आहोत असं भाजपतर्फे अधिकृतपणे एकनाथ खडसें यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून सांगितलं होतं. यामुळे शिवसेनेची साथ कोणी सोडली याबाबतचा पंतप्रधानांनी जुना रेकॉर्ड तपासून पाहावा” असे राऊत यांनी म्हटले आहे.

मिंध्यांच्या अपात्रतेबाबत पुढील आठवड्यात सुनावणी

मिंधे गटाचे सरदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या अपात्रतेची डेडलाईन जवळ आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पुढील आठवडय़ात यासंदर्भात सुनावणी घेणार आहेत. दोन्हीकडील प्रत्येक आमदाराची प्रत्यक्ष सुनावणी घेतली जाणार असल्याची माहिती विधान भवनातील सूत्रांकडून मिळाली.

अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मिंधे गटाच्या आमदारांना त्यांचे उत्तर दाखल करण्यासाठी नोटीस पाठवली होती. त्यानुसार शिवसेनेच्या आमदारांनी त्यांचे उत्तर अध्यक्षांकडे दाखल केले आहे. मिंधे गटाच्या आमदारांनी आपले उत्तर सादर करण्यास दोन आठवडय़ांची मुदतवाढ मागितली होती. अध्यक्षांनी त्यांना मुदतवाढ दिली होती. कोणाचे आमदार पात्र आणि कोणाचे आमदार अपात्र हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे.

निकालाच्या भीतीने मुख्यमंत्र्यांसह मिंधे गटातील मंत्री आजारी

दरम्यान, अपात्रतेचा निकाल जवळ येताच मिंधे गटातील मंत्री आजारी पडले आहेत. सध्या सुरू असलेले साथीचे आजार त्यांना बाधले की निकालाच्या भीतीने ते आजारी पडले, अशी चर्चा मंत्रालयात सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मिंधे गटाचे प्रवक्ते, शालेय शिक्षणमंत्री हे आजारी पडल्याने आज मंत्रालयात आले नव्हते. त्यानंतर चर्चांना ऊत आला.