गुलदस्ता – कोकिलाबेन बनली निरुपा रॉय

>>अनिल हर्डीकर

“मेरे पास माँ है” हा डायलॉग होताक्षणी अख्खं थिएटर टाळ्यांनी, शिट्टय़ांनी दणदणून जातं. ही माँ असते… निरुपा रॉय! हिंदी चित्रपटांतून आईच्या भूमिका करणाऱया अभिनेत्रींपैकी एक. निरुपा रॉय आणि निर्माते / दिग्दर्शक व्ही. एम. व्यास यांची दैवयोगाने भेट झाली आणि कोकिलाबेन निरुपा रॉय बनली,

हिंदी चित्रपटांतून आईच्या भूमिका त्या त्या काळात करणाऱया अनेक अभिनेत्री होऊन गेल्या. त्यापैकी अनेक जणी एकेकाळच्या नायिका होत्या. “मला हीच आई हवी” हा चित्रपटातील नायकांचा /नायिकांचा हट्ट पुरवता येतो. दादा कोंडके यांची पर्मनंट आई होती रत्नमाला. हिंदी चित्रपटांत सुलोचना, दीना पाठक, दुर्गा खोटे, रीमा लागू, जानकी, उषा नाडकर्णी अशा आईच्या भूमिका करत असलेल्या अनेक अभिनेत्री आहेत. त्या लांबलचक यादीत आणखी एक नाव आहे.

शशी कपूर आणि अमिताभ बच्चन या दोन भावांमधला ‘दीवार’ चित्रपटातला गाजलेला संवाद आठवतोय? परिस्थितीने स्मगलर झालेला मोठा भाऊ अमिताभ बच्चन आणि पोलिस खात्यात दाखल झालेला कर्तव्यदक्ष भाऊ शशी कपूर यांची एका पुलाखाली नियोजित भेट होते. परस्परविरोधी जीवन मूल्यांचे पुरस्कार करणारे दोघे समोरासमोर भिडतात. संवादातून वाद निर्माण होतो. ऐहिक सुखं ज्याच्या पायावर लोळण घेताहेत असा मोठा भाऊ धाकटय़ा भावाला घमेंडीत विचारतो, म्हणतो, “आज माझ्याकडे सारं काही आहे. बंगला, गाडी, ऐशआराम. तुझ्याकडे काय आहे?” त्यावर शांतपणे धाकटा भाऊ म्हणतो,“मेरे पास माँ है…” आणि अख्खं थिएटर टाळ्यांनी, शिट्टय़ांनी दणाणून जातं. त्यांची माँ असते… निरुपा रॉय!

निरुपा रॉय या अभिनेत्रीने आईच्या भूमिका करायला सुरुवात करण्यापूर्वी ती हिंदी आणि गुजराती चित्रपटांतून नायिका म्हणून वावरली आहे हे आजच्या पिढीला माहीत असेल किंवा नसेल, पण तिला चित्रपटात काम करायची इच्छा नसताना ती केवळ दैवगतीमुळे चित्रपटात आली याची कल्पना नसेल… आणि त्या गोष्टीला कारणीभूत ठरली तिची व निर्माते आणि दिग्दर्शक असलेले व्ही. एम. व्यास यांची भेट.

फ्लॅशबॅक… किशोरचंद्र लल्लूभाई बलसारा नावाचा बलसाडचा एक गुजराती तरुण होता. बलसाडमधल्या एका कोकीलाबेन नावाच्या तरुणीशी त्याचं लग्न झालं. त्यावेळी तो एका गिरणीत कामाला होता. लग्नानंतर काहीच दिवसांत त्याला रेशन खात्यात नोकरी लागली, पण किशोरचंद्रला चित्रपटांतून काम करण्याची अतिशय इच्छा होती. रेशन खात्यातील नोकरी सांभाळून तो मुंबईच्या निरनिराळ्या स्टुडिओंचे उंबरठे झिजवत होता. त्याची पत्नी कोकिलाबेन त्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्याच्या सोबत जात असे. एकदा तो निर्माते आणि दिग्दर्शक व्ही. एम. व्यास यांना भेटायला गेला. सोबत कोकिलाबेन होती.

आपल्याला चित्रपटात काम करायला मिळालं तर हवं आहे, असं किशोरचंद्रने त्यांना सांगितलं. व्ही. एम. व्यास यांनी विचारलं, “तुझ्यासोबत जी कुणी आहे ती कोण आहे?”

किशोरचंद्रने ती त्याची पत्नी असल्याचं सांगितलं. व्यास म्हणाले, “मी तुला तर काही काम देऊ शकणार नाही, परंतु जर तुझ्या पत्नीची चित्रपटात काम करण्याची इच्छा असेल तर मी तिला संधी देऊ शकतो.”

किशोरचंद्रने व्यास साहेबांचा प्रस्ताव मान्य केला. कोकिलाबेन तयार झाली. तिचं खरं नाव चित्रपटासाठी अयोग्य वाटून कोकिलाबेनचं नव्या नावाने बारसं करण्यात आलं. कोकिलाबेनची आता ‘निरुपा रॉय’ झाली. एवढंच नव्हे तर किशोरचंद्रने आपलं नाव टाकलं आणि तोही ‘कमल रॉय’ झाला. लग्न झाल्यावर पत्नीचं नाव बदललं जातं. पण इथे पत्नीमुळे पतीने नाव बदललं आणि मग हा कमल रॉय अखेरपर्यंत आपल्या पत्नीचा पोटरी झाला.

‘राणकदेवी’ या गुजराती चित्रपटापासून सुरू झालेली तिची चित्रपट कारकीर्द अखेरपर्यंत बहरत राहिली. काळाची पावलं ओळखून ती नायिकेच्या भूमिकेतून चरित्र भूमिकांकडे वळली. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून तिला तीन पुरस्कार मिळाले (‘छाया’, ‘मुनीमजी’ आणि ‘शहनाई’), तर ‘दीवार’मध्ये तिला नामांकन होतं.

कुणाकुणाची आई म्हणून ती चित्रपटांतून वावरली ते पाहूया…अमिताभ, विनोद खन्ना आणि ऋषी कपूरची ती ‘अमर अकबर अँथनी’मध्ये आई होती. सनी देओलची ‘बेताब’मध्ये तर धर्मेंद्रची आई झाली ‘माँ’ या चित्रपटात. ‘प्यार का मौसम’मध्ये ती शशी कपूरची आई होती, तर विनोद खन्नाची ‘आन मिलो सजना’ आणि ‘कच्चे धागे’मध्ये आई होती. रणधीर कपूरची आई होती ‘जवानी दीवानी’मध्ये. ‘तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ऐ माँ’…‘राजा और रंक’ या चित्रपटातलं तिच्यावर चित्रित झालेलं हे लोकप्रिय गाणं तिच्यासाठी महेश कोठारेने पडद्यावर गायलं होतं.

2004 साली तिला जीवन गौरव पुरस्कार मिळाला आणि 13 ऑक्टोबर 2004 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने ती मरण पावली.

नशीब, नियती, किस्मत, दैव… काहीही नाव द्या. चित्रपटात काम मिळावं म्हणून प्रयत्न करत असलेल्या तिच्या पतीला मागून जे मिळालं नाही ते कोकिलाबेनला न मागता मिळालं. त्याला कारणीभूत ठरली होती व्ही. एम. व्यास आणि कोकिलाबेनची ती पहिली भेट.

[email protected]