दखल – विज्ञाननिष्ठ सत्याचा ऊहापोह

>>ए. के. पवार

डा. ब्रूस एच. लिप्टन यांचे ‘द बायोलॉजी ऑफ विलीफ’ हे पुस्तक एका नव्या विज्ञाननिष्ठ सत्याचा सखोल ऊहापोह करणारे आहे. ते सत्य म्हणजे ‘मानवी पेशींचे आयुष्य हे जनुकांमुळे नाही तर सभोवतालच्या भौतिक व ऊर्जायुक्त वातावरणामुळे नियंत्रित केले जाते’ हा नवा वैज्ञानिक साक्षात्कार होय! याच विज्ञाननिष्ठ विषयाचे शास्त्रीय सिद्धांतांसह विश्लेषण या पुस्तकामध्ये केले आहे. आपण आयुष्याकडे ‘कसे पाहतो’ यावर आपले आयुष्य ‘कसे असेल’ हे ठरते. आपल्या स्वतःच्या विचारमंथनाबाबतचे मत हे पुस्तक वाचल्यावर कायमचे बदलून जाईल. आपले जीवन हे जनुकांच्या (डी.एन.ए.) हातातील कठपुतळी नसून आपणच आपल्या नशिबाचे शिल्पकार आहोत हे वैज्ञानिक सत्य लेखकाने जगापुढे मांडले आहे.

सजीवसृष्टी, त्या सभोवतालचं वातावरण आणि विचार, समजुती, सुप्त मनाचे कार्य, परस्परसंबंधाबाबतची नवी दृष्टी व जाणीव लेखकाने या पुस्तकातून करून दिली आहे. या सर्वांचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणामसुद्धा विशद केला आहे. योग्य संदर्भासहित स्पष्टीकरणे, आकृती आणि उदाहरणे यामुळे हे पुस्तक प्रत्येक जीवशास्त्राच्या व आरोग्यशास्त्राच्या अभ्यासकाने आवर्जून वाचायलाच हवे.

डॉ. ब्रूस एच. लिप्टन हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पेशीशास्त्रज्ञ आहेत. विज्ञान आणि आत्मा यांची सांगड घालणारे, नव्या जीवशास्त्राचे प्रणेते अशी त्यांची कीर्ती आहे. विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी पेशीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठातून संशोधन केले. अनेक टीव्ही आणि रेडिओ कार्यक्रमांतून त्यांनी व्याख्याने दिली आणि अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रमुख वक्ता म्हणून त्यांनी सादरीकरण केलेले आहे.
अनुवंशशास्त्राच्या आतापर्यंत रूढ असलेल्या वर्चस्वाचे गुपित

उलगडत स्वतःला आनुवंशिकतेचा बळी मानण्याच्या मानसिकतेला धुडकावून लावणारे हे पुस्तक अत्यंत निर्भीड आणि नवी दृष्टी देणारे आहे. आपल्या मानसिक धारणाच आपले आयुष्य घडवत असल्याची माहिती डॉ. लिप्टन केवळ सांगत नाहीत तर अत्यंत शास्त्रशुद्ध विवेचनाद्वारे पटवूनही देतात. या पुस्तकात डॉ. ब्रूस लिप्टन यांनी आपल्या संशोधनातून प्राप्त झालेले ‘मानव-विकास आणि बदलांचे सुजाण विज्ञान’ मांडले आहे. जनुकीय आणि जैविक मर्यादांमध्येच आयुष्याचा अर्थ शोधण्याची सवय सोडून आता आपण खरी आत्मिक शक्ती जागृत करायला हवी हेच हे पुस्तक सांगते. मन आणि शरीर यांच्यातल्या नात्याचा अभ्यास करणाऱयांनी वाचायलाच हवे असे हे पुस्तक आहे. सरळसोप्या भाषेत समजावणाऱया या पुस्तकातून सजीवता आणि सजगता यांच्यातले आतापर्यंत अगम्य असलेले दुवे स्पष्ट झाले आहेत.

}लेखसंग्रह ः द बायोलॉजी ऑफ बिलीफ  लेखक ः ब्रूस एच. लिप्टन  अनुवाद ः शुभांगी रानडे – बिंदू  प्रकाशक ः साकेत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर  पृष्ठे ः 253  किंमत ः 299 रुपये