हत्तीने केला कारचा फुटबॉल, आजरा तालुक्यातील देऊळवाडीत घडली घटना

तालुक्यात आता हत्ती हा रहिवासीच झाला आहे. या टस्कराने तालुक्यातील देऊळवाडीमध्ये बुधवारी रात्री मोठा कारनामा केला. गावच्या शिवारात प्रवेश करीत त्याच्या आवाक्यात सापडलेल्या कारला त्याने फुटबॉलप्रमाणे खेळवत नेले आणि त्याचे मन भरल्यानंतर तो एका शेतात ढकलून निघून गेला. यामध्ये कारचा पूर्ण चुराडा झाला.

अनेक वर्षे आजरा तालुक्यात हत्तींच्या या खेळात प्रचंड नुकसान होत आहे. भरपाई शासकीय नियमाने मिळते, पण ती अत्यंत तुटपुंजी आहे. त्यासाठी अर्ज केले, विनंत्या केल्या, आंदोलनेही होत आहेत. पण, अस्मानी संकटापेक्षाही अधिक नुकसान करणाऱया हत्तींच्या नियमित संकटास रोखणे जमलेले नाही, ते जमणेही अशक्य आहे. तरीही वनविभाग प्रयत्नशील आहे, हे खरे. पण अपेक्षित यश नसल्याने हत्तीच्या वास्तव्याचा स्वीकार करीत सहजीवन स्वीकारलेल्या आजरेकर शेतकऱयांना मात्र कित्येकवेळा नुकसान सहन करावे लागतेच. हेच वास्तव पुन्हा एकदा देऊळवाडीतील घटनेने अधोरेखित केले आहे.

आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्पानजीकच्या देऊळवाडी गावातील हणमंत सावंत यांच्याबाबत बुधवारी हा वेगळाच प्रकार घडला. सावंत यांनी स्वतःच्या घरासमोर लावलेली चारचाकी आगंतुकपणे गावात अवतरलेल्या हत्तीने सोंडेने उचलून सुमारे 300 फूट फुटबॉलसारखी खेळवत नेली आणि नजीकच्या भातशेतामध्ये ढकलून दिली. या पार्श्वभूमीवर, सावंत यांना त्यांच्या कारच्या काचा, दोन्ही दरवाजे, बॉनेटचे नुकसान हताशपणे पाहण्याशिवाय पर्याय राहिला नाही. काही वर्षांपूर्वी नजीकच्या इटे गावामधील पांडुरंग सुकवे यांचीही कार हत्तीने फोडली होती. गेला आठवडाभर हत्तीचा धुमाकूळ देऊळवाडी, खानापूर, इटे, रायवाडा परिसरात सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्याच्या सीमेनजीक वसलेल्या आणि मुबलक चारा, पाणी, जलाशय असल्याने आणि येथून हत्ती इतरत्र जाणे अशक्य असल्याचे वास्तव स्वीकारत आजरेकरांकडून ‘हत्ती, तू काहीही कर, बिनधास्त वावर, नुकसान कर. शेतीअवजारे, पाण्याच्या टाक्या, ट्रॉल्या आणि चारचाकी वाहनांचा फुटबॉलही कर; पण मनुष्यहानी नको करू,’ अशीच प्रार्थना करण्यात येत आहे.