सत्ताबदलाच्या संकेतामुळे मस्क यांचा दौरा लांबणीवर; विरोधकांचा मोदी सरकारला सणसणीत टोला

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी त्यांचा हिंदुस्थान दौरा लांबणीवर टाकल्याचे वृत्त आहे. त्यांच्या या दौऱ्याची जोरदार चर्चा होती. मात्र मस्क यांनी हिंदुस्थानात सत्ता बदलणार याचा अंदाज आल्यानेच त्यांनी त्यांचा हिंदुस्थान दौरा लांबवणीवर टाकला आहे, अशा शब्दांत काँग्रेसने मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे.

मस्क आता निवडणुकीनंतर हिंदुस्थानात येणार आहेत. म्हणजेच सरकार बदलणार याचा अंदाज आल्यामुळेच मस्क यांनी दौरा पुढे ढकलला आहे. जगभरातल्या लोकांना मोदी पुन्हा येणार नाहीत हे कळून चुकले आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी म्हटले आहे.

400 पारच्या गप्पा निरर्थक

दुसऱ्या एखाद्या देशात मोठी आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पंपन्या गुंतवणूक करण्यापूर्वी त्या देशातील आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करतात. काही पंपन्या तर सामाजिक परिस्थितीवरही लक्ष ठेवून असतात. या पंपन्यांच्या प्रमुखांच्या दौऱ्यांचे नियोजन कित्येक महिने आधीच केले जात असते. असे असताना मस्क यांनी त्यांचा दौरा लांबणीवर टाकला. याचाच अर्थ हिंदुस्थानात निवडणुकांनंतर सत्तापरिवर्तन होईल, याचा त्यांना अंदाज आला असून कितीही 400 पारच्या गप्पा मारल्या तरी मोदी पुन्हा सत्तेवर येणार नाहीत. मोदी आणि भाजपचा पराभव अटळ आहे, असे गाडगीळ म्हणाले.