हेमंत सोरेन यांना पुन्हा ईडीचे समन्स

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरू असतानाच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पुन्हा एकदा समन्स बजावले. ईडीकडून सोरेन यांना पाठवलेले हे तिसरे समन्स आहे. रांचीमधील जमीन घोटाळा प्रकरणी हे समन्स बजावले असून 9 सप्टेंबरला चौकशीसाठी उपस्थित राहा, असे या समन्समध्ये म्हटले आहे.

ईडीने याआधी दोन वेळेस हेमंत सोरेन यांना समन्स पाठवले. परंतु ते चौकशीसाठी गेले नाहीत. उलट ईडीच्या समन्सविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणी सुनावणी अद्याप बाकी आहे. ईडीचे समन्स हे असंविधानिक असून द्वेषभावनेने पाठवलेले आहे, असे हेमंत सोरेन यांनी म्हटले आहे. हेमंत सोरेन यांना पहिले समन्स 14 ऑगस्टला, दुसरे 24 ऑगस्टला तर तिसरे 1 सप्टेंबरला पाठवले. हेमंत सोरेन हे ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आले होते. ते मुंबईत असतानाच त्यांना ईडीने तिसरे समन्स पाठवले आहे. दरम्यान, इंडिया आघाडीची ताकद पाहून भाजपमध्ये प्रचंड घबराट पसरली असून ते आगामी काळात तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांवर धाडी टाकतील तसेच त्यांना अटक करतील, असा इशारा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘इंडिया’च्या बैठकीनंतर दिला होता.