R. Madhavan एफटीआयआयच्या अध्यक्षपदी आर.माधवन याची निवड

देशातील प्रसिद्ध अशा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (FTII)च्या अध्यक्षपदी प्रसिद्ध अभिनेता आर.माधवन याची निवड करण्यात आली आहे. आर.माधवन याची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (FTII) अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उपसचिव धनंजय कुमार यांनी यासंदर्भाती आदेश जारी केले आहेत “फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या नियम 3 (1)1 आणि 22 (1) नुसार, रंगनाथन माधवन यांची FTII सोसायटीचे अध्यक्ष म्हणून नामनिर्देशन करण्यात आले आहे आणि कार्यभार स्वीकारल्यापासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी ते FTII च्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष असतील असे आदेशात म्हटले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर माधवन यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत माधवन याने म्हटले की, या नव्या जबाबदारीमुळे मला सन्मामित झाल्यासारखे वाटत आहे. हा महिना आनंदाचा होता, मात्र या बातमीमुळे मला खऱ्या अर्थाने नव्या जबाबदारीची जाणीव झाली आहे. एफटीआयआय ही देशातील एक उत्तम संस्था असून या संस्थेने देशाला अनेक प्रतिभावंत कलाकार दिले आहेत. त्यामुळे हा माझ्यासाठी एक मोठा सन्मान असून मला आशा आहे की मी या संस्थेत चांगला बदल घडवून आणू शकेन. अभिनेता माधवन याने दिग्दर्शित केलेल्या ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाला 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

अभिनेता आर.माधवनने याने तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका ठसठशीतपणे प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेल्या आहेत. ‘थ्री इडियट्स’, ‘रंग दे बसंती’ आणि ‘रहना है तेरे दिल में’ मधील त्याच्या भूमिकांचे प्रचंड कौतुक झाले होते.