एकाच मुलीवर दोघांचे प्रेम जडले आणि गोळीबार झाला….

राजकारण असो अथवा प्रेम दोघात तिसरा आला की नात्यातल्या गणितांमध्ये बिघाड झाल्याची अनेक उदाहरणे तुमच्या पाहण्यात किंवा वाचण्यात आली असतील. असाच एक विचित्र प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. एकाच मुलीवर दोघांचे प्रेम जडले आणि भर चौकात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

सदर घटना उत्तर प्रदेश राज्यातील कानपूरमध्ये घडली आहे. कानपूर मधील मोहम्मद अली पार्कमध्ये सर्व प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार पिंकीवर (बदलेले नाव) हातीफ आणि ताहा या दोघांचे प्रेम होते. यावरून दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. दोघेही मोहम्मद अली पार्कमध्ये आपआपल्या मित्रांसोबत समोरासमोर आले. तेव्हा हतीफने ताहाला सांगितले की,”ही माझी प्रेयसी आहे तू तिच्याशी बोलू नको”. यावर ताहाने उत्तर दिले की, “ती फक्त माझी आहे”. या एका वाक्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून हवेत तीन राऊंड फायर करण्यात आल्या, त्यामुळे आजुबाजुच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गर्दीचा फायदा घेत सर्वांनी तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताचं पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतर ओसामा, मुन्ना उर्फ अदनान आणि फरहान यांना दोन अवैध पिस्तुल आणि काडतुसांसह ताब्यात घेतले. पोलीस अधिकारी आरएस गौतम यांनी सांगितले की, तिघेही चमनगंज भागातील रहिवासी आहेत. तपास केल्यानंतर माहिती मिळाली की हातिफ आणि ताहा या दोघांचे एकाच तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे ही घटना घडली. दोन्ही मुख्य आरोपी फरार असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.