चोरीचा मोबाईल वापरून केला पाच लाखांच्या खंडणीसाठी फोन

अंडरवर्ल्डचे नाव घेऊन हॉटेल व्यावसायिकाला पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी फोन करणाऱया चौघांना कांदिवली पोलिसांनी अवघ्या 24 तासांत बेडय़ा ठोकल्या. अरबाज मुजावर, उसामा शाह, इद्रिस खान, सलमान सय्यद अशी त्या चौघांची नावे आहेत. चोरीचा मोबाईल वापरून त्याने पह्नवरून धमकी दिल्याचे तपासात समोर आले आहे.

तक्रारदाराला सोमवारी एका नंबरवरून पह्न आला. उद्या सकाळपर्यंत पाच लाख रुपये हवेत, आपला माणूस पह्न करेल तेव्हा पैसे तयार ठेवावे. पैसे तयार न ठेवल्यास जिवाला मुकशील असे त्याना सांगितले. घडल्या प्रकाराची माहिती कांदिवली पोलिसांना दिली. याप्रकरणी सहाय्यक आयुक्त शैलेंद्र धिवार यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक संदीप विश्वासराव याच्या पथकातील पोलीस निरीक्षक आनंद कांबळे, सहाय्यक निरीक्षक हेमंत गीते, जगदाळे, गावकर, तावडे, केसरकर, घोडके आदी पथकाने तपास सुरू केला. माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक मालवणी येथे गेले. तेथून पोलिसांनी सलमानला अटक केली. त्याच्या चौकशीत इद्रिस, उसामा आणि अरबाजला अटक केली.

बीचवरून जाऊन केला धमकीचा फोन 

अटक आरोपींनी झटपट पैशांसाठी हा कट रचला. 26 जानेवारीला सलमान आणि इद्रिसने मालाड पूर्व येथून एका घरातून दोन मोबाईल चोरले. चोरी केलेला एक मोबाईल त्याने अरबाज आणि उसामाला दिला. त्यानंतर अरबाज आणि उसामा हे मालवणी येथील बीचवर गेले. तेथून त्याने व्यावसायिकाला धमकीचा फोन केला.