इदगाह मैदानात गणेशाच्या प्रतिष्ठापनेस परवानगी, अंजुमन ए इस्लामची याचिका फेटाळली

कर्नाटकातील हुबळी येथील इदगाह मैदानात गणेशोत्सवामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. ही परवानगी मिळू नये यासाठी अंजुमन-ए-इस्लामतर्फे याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. हुबळी धारवाड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या मैदानात गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशी अंजुमन-ए-इस्लामतर्फे याचिका दाखल करण्यात आली होती.

हुबळी धारवाड महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते सुवर्णा मणिकुंतला यांनीही या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. या मुद्दासंदर्भात दाखल जालेल्या याचिकांवर न्यायमूर्ती सचिनकुमार मगदूम यांच्या खंडपीठापुढे एकत्रित सुनावणी झाली होती. न्यायमूर्ती मगदूम यांनी या सगळ्या याचिका फेटाळून लावल्या होत्या. हुबळी धारवाड पश्चिमचे आमदार अरविंद बेलाड यांनी महापालिका आयुक्त इदगाह मैदानात गणेशोत्सवामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करण्यास परवानगी देण्यास उशीर होत असल्याबद्दल धरणे आंदोलन सुरू केले होते. आयुक्त ही परवानगी देण्यास मुद्दाम उशीर करत असल्याचा आरोप बेलाड यांनी केला होता. आजच्या आदेशामुळे आयुक्तांना यासंदर्भात आदेश देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मैदानात गणेशाची प्रतिष्ठापना करण्याची 4 मंडळांनी परवानगी मागितली होती. इदगाह मैदानाच्या वापरासंदर्भात पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिला होता. वर्षातून दोनवेळा या मैदानावर नमाझ पढायची परवानगी असून अन्य वेळी हे मैदान वैध गोष्टींसाठी वापरण्यास हरकत नाही असे न्यायालयाने म्हटले होते. त्यानुसार गेल्यावर्षी महापालिकेने या मैदानावर गणेशोत्सवाला परवानगी दिली होती.