कायद्याचे राज्य असे असते काय? कुख्यात गुंडाचे मुख्यमंत्र्यांसोबत फोटोसेशन

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणकी एका गुंडाचे फोटो जगासमोर आले आहेत. निलेश घायवळ असे या कुख्यात गुंडाचे नाव असून त्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी करण्यात आलेल्या फोटो सेशनमधला एक फोटो शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला असून, कायद्याचे राज्य असे असते काय? असा सवाल त्यांनी विचारला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत फोटोत दिसणारा निलेश घायवळ हा कुख्यात गुंड असून त्याच्याविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, धमकावणे, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.

घायवळ आणि मारणे टोळीचे वैर

निलेश घायवळ हा गजा मारणेच्या डोळीचा एकेकाळी सदस्य होता, दोघे जिवलग मित्र होते मात्र वर्चस्वाच्या लढाईतून दोघे एकमेकांच्या जीवावर उठले. मारणेने घायवळला ठार मारण्यासाठी हल्ला केला होता मात्र घायवळ त्यातून बचावला होता. काही दिवसांपूर्वी अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार याने गजा मारणेची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली होती. आता गजा मारणेचा प्रतिस्पर्धी असलेल्या घायवळने थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. एकमेकांना शह देण्यासाठी या दोघांनी राजकारणाचा आसरा घेतल्याचे बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्र्यांचे सुपुत्र कुख्यात गुंड गजानन मारणेच्या घरी

राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून गुन्हेगारी आटोक्यात असल्याच्या फुशारक्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मारत असतात. मात्र त्यांचे दावे टराटरा फाडण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचा मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे हे न चुकता करत आहेत. एकनाथ शिंदेंसोबत कुख्यात गुंड दीपक सपकेच्या पक्ष प्रवेशावेळचे, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारने गजा मारणेच्या भेटीवेळचे आणि श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने घेतलेल्या भेटीवेळचे फोटो व्हायरल झामुळे ‘हे आपले सरकार आहे’ असा जाहीर सभांमधून आव आणणारे मिंधे उघडे पडले आहेत.