मिंध्यांचं गुंडाराज! गुंड, दरोडेखोरांनी ‘ढापलं’ सरकार

गुन्हेगारी आटोक्यात असल्याच्या फुशारक्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मारत असले तरी उल्हासनगरमध्ये भाजप आमदारानेच पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबारावरून महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्रीपुत्र श्रीकांत शिंदे यांचे कुख्यात गुंड, दरोडेखोर आणि दहशतवादी कारवाया करणाऱया ‘सीमी’सारख्या संघटनांशी कनेक्शन असलेल्या अट्टल गुन्हेगारांसोबतचे पह्टोच सोशल मिडियात व्हायरल झाले आहेत. हे आपले सरकार आहे असा जाहीर सभांमधून आव आणणारे मिंधे यामुळे उघडे पडले आहेत. राज्यात मिंध्यांचं जंगलराज सुरू असून गुंड आणि दरोडेखोरांनी ‘ढापलं’ सरकार अशीच भयंकर स्थिती आहे.

श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. याबाबतचा पह्टोच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. गुंडांना राजाश्रय आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पुणे शहरातील या कुख्यात गुंडाने रविवारी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. मिंधे गटाच्या युवासेना पश्चिम निरीक्षक अनिकेत जावळकर यांच्याबरोबर तो श्रीकांत शिंदे यांना ‘वर्षा’वर जाऊन भेटला. मात्र त्याने श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा देतानाचा पह्टो व्हायरल होताच सोशल मीडियासह प्रसारमाध्यमांत जोरदार चर्चा सुरू झाली. पोलिसांकडूनही नेमकी ही व्यक्ती कोण, याचा शोध घेण्यात आला. यानंतर ही व्यक्ती पुण्यातील कुख्यात गुंड असल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर दाभेकर याची श्रीकांत शिंदे यांच्याशी भेट घडवून देणाऱया मिंधे गटाच्या युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक अनिकेत जावळकर याची हकालपट्टी करण्यात आल्याचे समजते. पूर्वेश सरनाईक यांनी याबाबत पत्रक काढून त्याची हकालपट्टी केल्याचे समजते.

सरकारी आशीर्वादाने गुंड मोकाट – संजय राऊत

कुख्यात गुंडांना राजाश्रय मिळत असल्याच्या प्रकाराचा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलीस ठाण्यात सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात. गुंडांचे बळ इतके का वाढले, असा सवाल संजय राऊत यांनी ‘एक्स’वरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. महाराष्ट्रात मिंधे सरकारच्या आशीर्वादाने गुंड मोकाट असल्याचा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला आहे.

धाक निर्माण करून राजकीय हित साधायचे प्रयत्न – अंबादास दानवे

जनतेच्या मनात धाक निर्माण करायचा आणि राजकीय हित साधायचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानीच गुंड पोहचत असतील तर हे राज्य गुंडांचे आहे असंच म्हणावे लागेल. कोणी म्हणतं यांचा बॉस ‘वर्षा’वर आणि कोणी म्हणतं ‘सागर’ बंगल्यावर बसलाय. गृहमंत्री म्हणून फडणवीस यांचा वचक राहिला नाही, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोटनिवडणुकीत तुरुंगातून अनेक गुंडांना सोडवण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हॉटेलमध्ये जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेतल्या याची माहिती आमच्याकडे आहे असेही दानवे म्हणाले.

हे राज्यच आता असुरक्षित झाले आहे – नाना पटोले

महाराष्ट्रात गुंडाराज चाललेय हे काही आता लपून राहिलेले नाही. सातत्याने आम्ही याबाबत भूमिका मांडली आहे. त्यांचे आमदारच आता बंदुका घेऊन फिरतायत. जमिनी खंडणी, अभियंते आणि अधिकाऱयांना धाकदपट करून लुटमाऱया सुरू आहेत. हे राज्य आता असुरक्षित झाले आहे. आमदाराने जो काही गोळीबार केला या प्रकरणात सरकारने खरेतर राजीनामा दिला पाहिजे, असे कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

कुख्यात सुपारी किलर दीपक सपकेचा मिंधे गटात प्रवेश

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या टोळीतील शार्प शूटर आणि सुपारी किलर दीपक सपके याचा पह्टोही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत व्हायरल झाला आहे. सपके याने मिंधे गटात प्रवेश केला असून मिंधे गटाचा पट्टाही त्याच्या गळय़ात दिसत आहे. सपके याच्यासोबत मुख्यमंत्र्यांचा हास्यविनोद करताना व्हायरल झालेला हा पह्टो पाहून मिंधे यांनी महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आणले आहे यावर शिक्कामोर्तबच झाले आहे. दीपक सपके हा येरवडा जेलमध्ये असताना त्याने जेलमधूनच सुपारी किलिंगचे कॉण्ट्रक्ट दिल्याचे समोर आले होते. डोंबिवलीतील भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांची हत्या करण्यासाठी पाच लाखांची सुपारी दीपक सपके याला देण्यात आली होती. मात्र म्हात्रे यांची हत्या करण्यापूर्वीच सपकेच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. सपकेवर ठाणे, उल्हासनगर, विठ्ठलवाडी-कल्याण, नाशिक, पुणे येथे सराफी पेढय़ांवर दरोडा, चेन स्नॅचिंग, लुटमार, खंडणी, अपहरण, हत्या असे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.

आसिफ दाढीने घेतली अजित पवारांची भेट

पिंपरी-चिंचवडमधे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आसिफ महंमद इक्बाल शेख ऊर्फ आसिफ दाढी याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत त्यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेतल्याने तो चर्चेत आला आहे. पुण्यातील गुन्हेगारी विश्वात एकेकाळी वर्चस्व गाजवलेल्या कुख्यात मेघनाथ शेट्टी टोळीमधून उदयाला आलेल्या आसिफ दाढी याचा तब्बल 36 वर्षाचा गुन्हेगारी इतिहास आहे. मारहाणीपासून अपहरण करून खून, खुनाचा प्रयत्न, जागा बळकावणे असे आठ गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. आसिफ याचा ‘सिमी’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी चौकशी केली होती.

पिंपरी-चिंचवडमधील ‘सीमी’शी कनेक्शन असलेला अट्टल गुन्हेगार आसीफ दाढी याने देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेतल्याचे छायाचित्र समोर आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत छोटा राजनच्या टोळीतील शार्प शूटर, दरोडेखोर दीपक सपकेचा मिंधे गटात प्रवेश.

मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसाला सरकारच्या बाळराजेंचे अभीष्टचिंतन करणाऱया व्यक्तीचा शोध घेतल्यास गुंडशाही कोण पोसतंय ते कळेल.

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानीच अशाप्रकारे गुंड पोहचत असतील तर हे राज्य गुंडांचं आहे, असंच म्हणावं लागेल.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मुले पक्षात गुंडांची भरती करत आहेत. महाराष्ट्राला हे इजा-बिजा-तिजा उद्ध्वस्त करायला निघाले आहेत.