लोटे औद्योगिक वसाहतीत वायू गळती; ग्रामस्थांमध्ये घबराट

गॅस टँकर अनलोडिंगचे काम सुरु असताना गॅस लिकेज झाल्याने लोटे औद्योगीक वसाहतीत काही काळ घबराट निर्माण झाली होती. सुदैवाने वेळीच गॅस गळती बंद करण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. लोटे औद्योगिक वसाहतीत अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने लोटे औद्योगिक परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

योजना इंटरमीजिएट या कारखान्यात गॅस टँकरमधून गॅस अनलोड करण्याचे काम सुरु होते. यावेळी अचानक गॅस वाहक पाईप लिकेज झाला आणि परिसरात गॅस पसरू लागला. त्याच दरम्यान व्हीडीएल या कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या सुक्या गवतावर  वीजवाहिन्यांच्या घर्षणाने ठिणगी पडून गवताला आग लागल्याने गॅस आणि आगीच्या धुराचे लोट आकाशात दिसू लागले. त्यामुळे या परिसरात गॅस लिकेज झाल्याचे वृत्त पसरल्याने लोटे चाळकेवाडी येथील ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली. काही वेळातच पाईपमधून होणारी गळती रोखण्यात आणि गवताला लागलेली आग विझवण्यात यश आल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला.

लोटे औद्योगिक परिसरात आग लागणे, गॅस गळती होणे, रिऍक्टरचा स्फोट होणे,  अशा घटना वारंवार घडतच असतात. त्यामुळे या ठिकाणी जरा देखील धूर दिसला तरी परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण होते. या आधी झालेल्या गॅस लिकेज दुर्घटनेत अनेकांना गॅस बाधा झालेली असल्याने गॅस लिकेज म्हटले की येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.