Pune porche accident – धंगेकरांनी स्पष्टचं सुनावलं! FIR आणि रिमांड कॉपीतील फरक स्पष्ट करत भाजप नेत्याला झापलं

पुण्यातील कल्याणीनगर येथे पोर्श गाडीची धडक देऊन दोघांचा जीव घेणाऱ्या वेदांत अग्रवालविरोधात आता वातावरण चांगलंच तापलं आहे. या सगळ्या प्रकरणात पोलिसांवरही वेदांतवर सौम्य गुन्हे लावल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावरून पोलिसांची बाजू घेत भाजपचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी पोस्ट केली होती. त्या पोस्टचा समाचार घेऊन महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी मोहोळ यांना झापलं आहे.

पोर्श अपघात प्रकरणात पोलिसांनी एफआयआरमध्ये भादंवि 304 हे कलम न जोडल्याचा आरोप करण्यात येत होता. तो आरोप खोटा असल्याचं म्हणत मोहोळ यांनी एक्सपोस्टवर काही फोटो शेअर केले. हे फोटो एफआयआरचे असल्याचं म्हणत त्यांनी पोलिसांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोहोळ यांनी शेअर केलेले फोटो हे एफआयआरचे नसून ते रिमांड रिपोर्टचे असल्याचं धंगेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

आपल्या पोस्टमध्ये धंगेकर म्हणाले की, तरी म्हंटल बिल्डरची बाजू मांडायला अजून तुम्ही कसे आला नाहीत ? कदाचित अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले असतील म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली आहे. आता तुम्हाला F.I.R आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का…? आमचं पहिल्या दिवसापासून एकच सांगणे आहे की F.I.R मध्ये 304 लावण्यात आलेला नाही.का नाही लावला…? सोबत पहिली F.I.R कॉपी जोडतोय.नीट वाचून घ्या. इथ २ कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत,त्यांच्या घरातली २ कमावते लोकं गेले आहेत त्यांचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही अजूनही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडताय….? पुणेकर म्हणून तुम्ही पुण्याच्या जनतेसोबत राहाल अशी माझी अपेक्षा होती पण आतापासूनच बिल्डर अन पोलिसांच्या चरणी आपली निष्ठा वाहत आहात. 3-4 वाजेपर्यंत पोलिसांना माहिती असताना पब चालतात, तेव्हा कुठं गेलेलात ? गृहमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत.पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले असते तर हि घटना घडली नसती, असं धंगेकर यांनी म्हटलं आहे.