बेकायदा वृक्षतोडीप्रकरणी युवकाचे आंदोलन

वृक्षारोपण आणि बेकायदा वृक्षतोड या प्रश्नांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील संतोष कांदेकर या युवकाने चक्क लाकडाचे सरण रचून त्यावर झोपून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. ‘सतेज फायटर, इचलकरंजी’ या संघटनेचे संतोष कांदेकर यांनी शुक्रवारी (15 रोजी) दुपारी 12 वाजता इचलकरंजी महापालिका कंपाऊंडलगतच्या रोडवर हे आंदोलन केले.

त्यानंतर सुमारे अडीच तासांनी उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी आंदोलकर्त्यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या मागण्यांबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कांदेकर यांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, कांदेकर याने महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे हे आपल्या कार्यालयात माजी नगरसेवकांना भेटतात. मात्र, कार्यकर्त्यांना भेटत नाहीत यात गौडबंगाल काय आहे? असा प्रश्न करीत, शासकीय आयजीएम रुग्णालयाबाहेर खड्डे काढले; पण वृक्षारोपण का होत नाही? तसेच महापालिकेच्या भगतसिंग उद्यानात विकत आणलेली झाडांची रोपे वाळून जात आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि ते सोडविण्यासाठी हे आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जितेंद्र मस्कर, संतोष हत्तीकर, महेश कोरवी, कपिल जाधव, अनिकेत तानुगडे, सुनील कांदेकर, सचिन वडर, अतुल तनपुरे, सागर कोले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.