चुकीच्या मार्गाने गेले त्यांना धडा शिकवणार- शरद पवार

हुकूमशाही शक्ती देशासाठी योग्य नसल्यानेच ‘इंडिया’ आघाडी हा नवा पर्याय आम्ही उभा केला असून आता आम्ही थांबणार नाही, चुकीच्या मार्गावर जाणार नाही, चुकीच्या मार्गावर गेलेल्यांना चांगल्या मार्गावर आणू आणि जे येणार नाहीत त्यांना धडा शिकवू, असे मोठे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी केले. हम झुकेंगे नही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीमुळे पुढची रणनीती ठरवण्यात मोठी मदत झाली असल्याचे सांगत शरद पवार यांनी या बैठकीचे चांगले नियोजन केल्याबद्दल उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे कौतुक केले. भाजप सरकारच्या काळात प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी स्थिती आहे. शेतकरी, कामगार, युवावर्गाच्या अनेक समस्या आहेत, असे शरद पवार म्हणाले.

देशातील जनतेमध्ये भाजपबद्दल नाराजी असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. देशातील राजकीय पक्ष सर्वसामान्य जनतेसाठी एकत्र आले. बैठका घेतल्या. त्यावर भाजपने टीका केली. ‘इंडिया’ आघाडीला घमंडिया म्हटले, पण खरे घमंडी कोण आहेत हे आता सिद्ध झाले आहे.

देशाची सत्ता हातात आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवणारे नेतृत्व खूप लांब गेले आहे, असे सांगत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. भाजपला लोकांनी सत्ता दिली, पण अधिकार हातात येताच भाजपने हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू केला. त्यामुळे लोकांमध्ये भाजपबद्दल नाराजी असल्याचे पवार म्हणाले.

‘राजकारणात राजकीय पक्ष एकत्र काम करण्याचे ठरवतात तर त्यांचे काम, धोरणे याबाबत काही शंका असू शकते, पण ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत बैठक घ्यायचे ठरवले तेव्हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घमंडिया असे म्हणत टीका केली होती. पण खरे अहंकारी कोण हे आता लोकांना कळून चुकले आहे. लोकशाहीमध्ये लोपं एकत्र येऊन बैठक घेतात हेसुद्धा ज्यांना पसंत नाही त्यांनाच अहंकारी म्हणतात,’ असे म्हणत पवार यांनी भाजपची टीका त्यांच्यावरच परतावून लावली.