Budget 2024 – कररचनेत कोणताही बदल नाही, प्रामाणिक करदात्यांची सपशेल निराशा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्य करदात्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. आयकराच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आला नसून करदात्यांना यामुळे कोणताही दिलासा मिळालेला नाहीये. अर्थमंत्र्यांनी त्यांच्या 58 मिनिटांच्या भाषणात म्हटले की, कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त आहे. आयकर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. परतावा देखील लवकर मिळतो आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा हा सहावा अर्थसंकल्प होता. लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्याच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात मोदी सरकार अनेक मोठया घोषणांचा पाऊस पाडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही मोठी घोषणा केली जाणार नाही असे केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण यांनी यापूर्वी सांगितले होते. परंतु, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात अनेक मोठय़ा घोषणा होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आजचा अर्थसंकल्प हा सामान्य नागरिकांची निराशा करणारा ठरला.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे अखेरचे अधिवेशन बुधवारपासून सुरू झाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली आणि नंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले होते.

अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे

  • कॉर्पोरेट कर घटवून तो 22 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय
  • भाड्याच्या घरात किंवा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी सरकार योजना आणणार.
  • घराच्या छतावर सौरउर्जा पॅनेल बसवणाऱ्या 1 कोटी घरांना 300 युनिटपर्यंतची वीज निशुल्क मिळणार
  • गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी 9-14 वयोगटातील मुलींचे लसीकरण करण्यास प्रोत्साहन देणार
  • आंगणवाडी केंद्रांची सुधारणा होणार
  • नव्या तंत्रज्ञानासाठी संशोधन करणाऱ्या तरुणांना 50 वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज देणार याशिवाय 1 लाख कोटींचा फंड उभा करणार
  • कृषी आणि शेतकऱ्यांसाठी कोणतीही मोठी योजना, सवलत जाहीर करण्यात आली नाही
  • वंदे भारत ट्रेनसाठी 400 बोगींमध्ये सुधारणा करण्यात येणार
  • उडान योजनेअंतर्गत 517 नवे हवाई मार्ग जोडले जाणार