कोरियावरील विजयासह हिंदुस्थान अव्वलच, आशियाई अजिंक्यपद हॉकी

यजमान हिंदुस्थानने चुरशीच्या लढतीत दक्षिण कोरियावर 3-2 गोल फरकाने विजय मिळवीत पुन्हा एकदा आशियाई अजिंक्यपद करंडक हॉकी स्पर्धेच्या गुणतक्त्यात अव्वल स्थान कायम राखले. विजयाची पाटी कोरी असलेल्या जपान व चीनचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे हिंदुस्थानसह मलेशिया, दक्षिण कोरिया व पाकिस्तान या संघांनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

निलकांत शर्माने सहाव्या मिनिटाला मैदानी गोल करीत हिंदुस्थानचे खाते उघडले. मात्र सुंघ्युम किमने 12व्या मिनिटाला मैदानी गोल करीत कोरियाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर हरमनप्रीत सिंगने 23व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत हिंदुस्थानला 2-1 असे आघाडीवर नेले. मग मनदीप सिंगने 33व्या मिनिटाला भन्नाट मैदानी गोल करीत हिंदुस्थानची आघाडी 3-1 अशी वाढविली. 58व्या मिनिटाला कोरियाला पेनल्टी मिळाली.

जिहून यांगने पेनल्टीवर अचूक गोल करीत कोरियाचे अंतर 2-3 असे कमी केले. मात्र पुढील दोन मिनिटे आणि अतिरिक्त वेळेत हिंदुस्थानने सावध पवित्रा घेत गोल होणार नाही याची खबरदारी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी झालेल्या इतर लढतींत मलेशियाने जपानचा 3-1 गोल फरकाने पराभव केला, तर पाकिस्तानने चीनला 2-1 गोल फरकाने हरवले.