तिसऱ्या टप्प्यातील मतदानावरही उष्णतेच्या लाटेचे सावट; मंगळवारी राज्यातील अकरा मतदारसंघांत मतदान

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यात मंगळवारी रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गसह अकरा मतदारसंघांत मतदान होणार आहे. या मतदारसंघातच वेधशाळेने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱया टप्प्यातील मतदानाप्रमाणे तिसऱया टप्प्यातही उष्णतेच्या लाटेमुळे मतदानाची टक्केवारी घसरण्याची भीती आहे.

रायगड, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, लातूर, धाराशीव, सोलापूर व अन्य काही जिह्यांत वेधशाळेने 7 मे रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या व दुसऱया टप्प्यात मतदान कमी झाले होते. त्यामागे उष्णतेची लाट हे एक कारण होते. आता तिसऱया टप्प्यातही ‘यलो ऍलर्ट’चा इशारा दिल्यामुळे राज्याच्या निवडणूक विभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रांच्या बाहेरील मंडपाचा आकार वाढवण्यात आला आहे. मतदारांसाठी प्रतीक्षा खोली (वेटिंग हॉल) बांधून त्यामध्ये बसण्याची सोय करण्यात येणार आहे. प्रत्येक बूथवर ‘ओआरएस’ची पाकिटे दिली जाणार आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे मतदार सकाळच्या वेळेत मतदानासाठी बाहेर पडतात. आणि मग त्यानंतर संध्याकाळी मतदानासाठी बाहेर पडतात. त्यामुळे 5 ते 6 या वेळेत मतदारांची संख्या वाढते. विशेष करून उन्हाळय़ात मोठे आव्हान असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले.

‘नोटा’चे प्रमाण वाढण्याची चिन्हे

2019 मधील लोकसभा निवडणुकीत 48 लोकसभा मतदारसंघांत तब्बल 4 लाख 47 हजार 543 मते ‘नोटा’ला पडली होती, पण सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे या वर्षी ‘नोटा’चे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वेधशाळेने राज्याच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची भीती असते. त्यामुळे आमच्यासमोर आव्हान आहे. पण मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आम्ही विविध उपाय योजले आहेत

एस. चोक्कलिंगम,
मुख्य निवडणूक अधिकारी

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यासाठी रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 11 मतदारसंघांत 7 मे रोजी मतदान होणार आहे. उद्या, प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या मतदासंघांत प्रचाराच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी सभा घेऊन तिसरा टप्पा गाजवला. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदानापूर्वी 48 तास अगोदर निवडणूक प्रचाराला पूर्णविराम दिला जातो. त्यानुसार रविवारी (5 मे) सहा वाजता अकरा मतदारसंघांत निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.