India Vs West Indies Test शतकोत्सवासाठी टीम इंडिया सज्ज, दुसरी कसोटी आजपासून

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीजचा यांच्यात क्वीन्स पार्क ओव्हलवर शतक महोत्सवी कसोटी सामना रंगणार आहे, पण कमकुवत वेस्ट इंडीजचा या कसोटीतही धुव्वा उडवत शतकोत्सव साजरा करण्यासाठी हिंदुस्थानी संघ सज्ज झाला आहे. पहिली कसोटी डावाने जिंकल्यामुळे दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकण्याचे ध्येय डोळय़ांसमोर ठेवूनच हिंदुस्थान उतरणार आहे. मात्र या कसोटींच्या शंभरीत समाधानकारक कामगिरी करण्यासाठी यजमान संघ प्रयत्न करणार आहे. एकंदरीत त्यांचा खेळ पाहता कसोटीचा निकाल अनपेक्षित लागेल, याची धुसर कल्पनाही नाही.

उभय संघांमध्ये आजवर झालेल्या 99 कसोटी सामन्यांत वेस्ट इंडीजने 30 विजय मिळविले आहेत. मात्र हे आकडे त्यांच्या पूर्व पुण्याईमुळे आहेत. मात्र हिंदुस्थानने गेल्या दोन दशकांत केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे 23 कसोटी सामन्यांत विजय नोंदविता आलेले आहेत. उभय संघांतील 46 सामने अनिर्णितावस्थेत संपले आहेत. गेल्या दोन दशकांत अनिर्णित कसोटींचा आकडा खालावला आहे. गेल्या 21 वर्षात वेस्ट इंडीजला हिंदुस्थानविरुद्ध साधा एक विजयही नोंदविता आलेला नाही. यावरून विंडीजचा कसोटी दर्जा किती खालावला आहे याची कल्पना येते.

गेल्या 24 कसोटी सामन्यांत हिंदुस्थानने विंडीजवर एकापेक्षा एक असे 15 विजय मिळविले आहेत तर उर्वरित नऊ सामने अनिर्णित सुटले आहेत. गेली कसोटीसुद्धा हिंदुस्थानने एक डाव आणि 141 धावांनी जिंकली होती.

गोलंदाजी रंग लाएगी

पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हलची खेळपट्टी नेहमीच वेगवान गोलंदाजीला पोषक ठरली आहे. त्यामुळे दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत विंडीजची वेगवान गोलंदाजी चमत्कार दाखवेल, अशी भोळी आशा विंडीजच्या संघ व्यवस्थापनाला आहे. हिंदुस्थानच्या फलंदाजांनी विंडीजच्या वेगवान गोलंदाजीसमोर सावध खेळ केल्यामुळे उद्या ते धडपडले तरी आश्चर्य वाटणार नाही. हिंदुस्थानी संघातही बदल होण्याची शक्यता फार कमी आहे. हिंदुस्थान अश्विन आणि जडेजा घेऊनच मैदानात उतरतील आणि वेगवान गोलंदाजीतही एखादा बदल अपेक्षित आहे. पण रोहित शर्माने विजयी संघालाच कायम ठेवले तर कुणालाही  नवल वाटणार नाही.

विक्रम एके विक्रम

 विराट कोहलीला वीरेंद्र सेहवागच्या 8586 धावांच्या विक्रमाला मागे टाकण्यासाठी केवळ 32 धावांची गरज. 32 धावा करताच तो सचिन, द्रविड, गावसकर आणि लक्ष्मणनंतर सर्वाधिक कसोटी धावा करणारा पाचवा हिंदुस्थानी असेल.

 अश्विनला 500 विकेट्सचा आकडा गाठण्यासाठी 14 विकेटची गरज आहे. पहिल्या कसोटीत त्याने 12 विकेट टिपल्या होत्या.

 हिंदुस्थानबाहेर सर्वाधिक तीन विजय पोर्ट ऑफ स्पेनमध्येच मिळविले आहेत. परदेशात मेलबर्नवरही हिंदुस्थानने तीन कसोटी जिंकल्या आहेत. ही कसोटी जिंकल्यावर हिंदुस्थानसाठी पोर्ट ऑफ स्पेनचे क्वीन्स पार्क ओव्हल सर्वाधिक यशस्वी मैदान ठरेल.

 हिंदुस्थान कसोटी इतिहासात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध शंभरपेक्षा अधिक कसोटी खेळला आहे. आता त्या यादीत वेस्ट इंडीजचाही समावेश होईल.