ISRO प्रज्ञान रोव्हरने काढले विक्रम लँडरचे फोटो

23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरलेला विक्रम लँडर (Vikram Lander) कसा दिसतो याची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. विक्रम लँडरमधून बाहेर पडून माहिती जमा करणाऱ्या प्रज्ञान रोव्हरने (Pragyan Rover) या लँडरचे फोटो काढले आहेत. इस्रोने हे फोटो X या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

प्रज्ञान रोव्हरवर दिशादर्शक कॅमेरा लावला आहे. या कॅमेऱ्यामुळे रोव्हेरला पुढचा रस्ता कसा आहे, त्यावरून पुढे जावे की नाही याची माहिती मिळत असते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडर उतरला असून इथे मोठमोठी विवरे आहेत. इथला रस्ता सपाट नसल्याने रोव्हर खड्ड्यात पडण्याची भीती असते. यामुळे हा कॅमेरा रोव्हरवर लावण्यात आलेला आहे. याच कॅमेऱ्याच्या मदतीने हा फोटो काढण्यात आला आहे.

चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर, प्रज्ञान रोव्हर रोज नवी माहिती इस्रोला पाठवत आहे. आज चांद्रयान 3 ने टिपलेले काही फोटो इस्रोने ट्वीट केले आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरू असलेल्या अभ्यासादरम्यान, प्रज्ञान रोव्हरसमोर चार मीटर खोल खड्डा आला. या खड्ड्याची चाहूल लागताच रोव्हरला सूचना पाठवण्यात आल्या. धोक्याची सूचना मिळताच रोव्हरने आपली दिशा बदलत दुसऱ्या बाजूने मार्गक्रमण केले. ही घटना रविवारी 27 ऑगस्ट रोजी घडली. मात्र याची छायाचित्रे इस्रोने 28 ऑगस्ट रोजी ट्वीट केली आहेत. पहिल्या फोटोमध्ये नेव्हिगेशन कॅमेराद्वारे टिपलेला चार मीटर खोल खड्डा दिसत आहे. तर दुसऱ्यामध्ये रोव्हर मार्ग बदलून दुसऱ्या मार्गाकडे कूच करताना दिसत आहे.