जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; गोळीबारात बीएसएफचे 2 जवान आणि नागरिक जखमी

गुरुवारी रात्री जम्मू-कश्मीरमधील अर्निया आणि सुचेतगड सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) पाच हिंदुस्थानी चौक्यांवर पाकिस्तान रेंजर्सनी बेछूट गोळीबार केल्यानं सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान आणि एक नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

अरनिया सेक्टरमध्ये रात्री 8 वाजता पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरू झाला. या गोळीबाराला हिंदुस्थानच्या लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं.

जम्मूच्या अरनिया येथील एका स्थानिकानं पीटीआयला सांगितलं की, ‘संध्याकाळच्या वेळात गोळीबार सुरू झाला. चार वर्षांनंतर अशी घटना घडत आहे. आमच्यासोबत मुले आहेत, त्यामुळे सर्व घरांमध्ये बंकर नसल्यामुळे ही चिंतेचं वातावरण आहे.’

दोन्ही बाजूंच्या गोळीबारात चार ते पाच चौकी लक्ष्य झाल्याचं बीएसएफच्या अधिकाऱ्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं.

जखमी जवानाला विशेष उपचारांसाठी जम्मूच्या जीएमसी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे, असं अधिकाऱ्यानं सांगितलं.

बीएसएफच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत पाकिस्तानी चौक्यांचे काही नुकसान झालं का, हे काही वेळानंतर कळेल, असंही ते म्हणाले.

सूत्रांनी पीटीआयला सांगितलं की, पाकिस्तानी रेंजर्सनी नागरी भागात मोर्टार गोळीबार केला, ज्यामुळे सीमेवरील लोकांमध्ये घबराट पसरली.

आग लागलेल्या काही भागात आंतरराष्ट्रीय सीमेसह अरनिया, सुचतगड, सिया, जबोवाल आणि ट्रेवा भागांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं.

अरनिया आणि जबोवालमधील लोक, विशेषतः स्थलांतरित मजूर, त्यांच्या घरातून पळून जाताना दिसले.