कश्मीरात चौथ्या दिवशीही दहशतवादी हल्ले सुरूच, शहीद जवानांची संख्या चारवर

जम्मू-कश्मीरात चौथ्या दिवशीही दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. अनंतनाग जिह्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन अधिकारी कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशीष ढोनक आणि पोलीस उपअधीक्षक हुमायून भट हे शहीद झाले. आज चौथ्या दिवशी आणखी एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आले. अनंतनागमध्ये बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला. शहीद जवानांची संख्या आता 4वर पोहोचली आहे.

चौथ्या दिवशीही अनंतनाग जिह्यात पर्वतरांगांमध्ये दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू असून सुरक्षा दलाचे जवानही गोळीबार आणि ग्रेनेड फेकत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. पर्वतरांगांमध्ये आणखी दोन ते तीन दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता असून यात लष्कर-ए-तोयबाचा कमांडर उजैर खान याचाही समावेश आहे. त्यामुळे स्निफर डॉग्स, ड्रोन, हेलिकॉप्टर आणि रॉकेट लॉन्चरच्या माध्यमातून सैन्य दलाकडून दहशतवाद्यांची शोधमोहीम राबवली जात आहे.

जय हिंद पापा म्हणत चिमुकल्याचा वडिलांना निरोप

अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले न्यू चंदीगडचे कर्नल मनप्रीत सिंग यांच्या पार्थिवावर त्यांच्या भदोजियान या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांचा 7 वर्षांचा मुलगा कबीर याने सैनिकाचा गणवेश घातला होता. त्याने जय हिंद पापा म्हणत वडिलांना निरोप दिला. त्या वेळी सर्वांचेच डोळे पाणावले. त्यांचे पार्थिव चंदीगडहून भदोजियान येथे आणले तेव्हा त्यांच्या घराबाहेर लोकांची मोठी गर्दी होती. कर्नल मनप्रीत यांची पत्नी त्यांच्या शवपेटीवर डोके ठेवून आक्रोश करत राहिली. दरम्यान, या वेळी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी शहीद मनप्रीत यांना श्रद्धांजली अर्पण केली.

दहशतवाद्यांना घेरले

दहशतवाद्यांना 4 किलोमीटरच्या परिघात घेरण्यात आल्याची माहिती सैन्य दलाच्या अधिकाऱयांनी दिली आहे. पर्वतरांगांमध्ये दहशतवाद्यांचा तळ असण्याची शक्यता असून त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून ग्रेनेड फेकले जात आहेत. रॉकेट लॉन्चरने हल्ले केले जात आहेत.

कश्मीरच्या अनंतनागमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला हल्ला हा गेल्या तीन वर्षांतील सर्वात मोठा हल्ला आहे. यंदाच्या जानेवारीपासून आतापर्यंत जम्मू-कश्मीरमध्ये 40 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला