अकाऊंट हॅक झालंय का? मोदींची तारीफ केल्याने शहला रशीदला ट्रोलर्सचा सवाल

आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडवटपणे टीका करणाऱ्या शहला रशीदने त्यांचे कौतुक केले आहे. तिने X वर पोस्ट करत आपले मत व्यक्त केले आहे. तिने मोदींचे कौतुक केलेले पाहून काहींच्या मनात शंका निर्माण झाली आहे की, तिचे X खाते हॅक तर झालेले नाही ना. कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर तिथल्या परिस्थितीबाबत शहलाने पोस्ट केली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेची एकेकाळी नेता असलेल्या शहला रशीदचे नाव “हिंदुस्थान तेरे तुकडे तुकडे होंगे” अशा घोषणा दिल्याचा आरोप लागल्याने चर्चेत आले होते. कलम 370 हटवण्याला शहलाने कडाडून विरोध केला होता. हे कलम हटवल्याने सैन्य लोकांच्या घरात घुसून लोकांना जबरदस्ती उचलत आहे, मारहाण करत आहे असा आरोप तिने केला होता. या आरोपांचे सैन्याने खंडण केले होते.

4वर्षांपूर्वी कलम 370 हटवण्याविरोधात भूमिका घेणाऱ्या शहला रशीद हिने 15 ऑगस्ट केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले आहे. कश्मीरमध्ये मानवाधिकाराचा रेकॉर्ड सातत्याने सुधारत आहे. कश्मिरी नागरिकांचे जीवन सर्वांगीण पद्धतीने सुधारावे ही सध्याच्या सरकारची भूमिका असल्याचे दिसत असल्याचे शहलाने म्हटले आहे. कश्मीरमधील नव्या पिढीला आता संघर्षाच्या वातावरणात राहावं लागणार नाही असं तिने म्हटलं आहे.

जेएनयूमध्ये पीएचडी करत असताना शेहला रशीदची गणना नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारची कडवट विरोधक म्हणून केली जात होती. जम्मू-काश्मीर, सांप्रदायिकता, असहिष्णुता, हिंदुत्व, अर्थव्यवस्था या मुद्द्यांवरून ती सरकारवर सातत्याने टीका करत होती.