संजय सिंह अन् अनिता श्योराण यांच्यात थेट लढत

राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) निवडणुकीत आता यूपी कुस्ती संघाचे उपाध्यक्ष संजय सिंह व 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेती अनिता श्योराण यांच्यात अध्यक्षपदासाठी थेट लढत रंगणार आहे. ही निवडणूक शनिवार, 12 ऑगस्टला होणार आहे.

जम्मू-कश्मीरचे दुष्यंत शर्मा व दिल्ली कुस्ती संघाचे जयप्रकाश यांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुरंगी लढत रंगणार आहे. दुष्यंत शर्मा हे अनिता श्योराण गटाचे आहेत, तर जयप्रकाश हे डब्ल्यूएफआयचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह गटाचे आहेत. आता संजय सिंह हे बृजभूषण यांच्या गटाचे उमेदवार आहेत. अनिता श्योराण यांना क्रीडा मंत्रालय व बृजभूषण यांच्याविरुद्ध आंदोलन करणाऱया साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया आदी कुस्तीपटूंचा पाठिंबा आहे. सचिवपदासाठी चंदिगडचे दर्शन लाल व रेल्वे प्रमोशन बोर्डाचे प्रेमचंद लोचाब यांच्यात लढत होणार आहे.