Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरात 23, हातकणंगलेत 27 उमेदवार निवडणूक रिंगणात

लोकसभा निवडणुकीत आज अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चारजणांनी माघार घेतल्याने येथे तब्बल 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर हातकणंगले मतदारसंघात पाच उमेदवारांनी माघार घेतल्याने येथे 27 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही मतदारसंघांत आतापर्यंतच्या इतिहासात यावेळी उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे.

उमेदवारांची संख्या अधिक असल्याने दोन्ही मतदारसंघांत उपलब्ध असलेल्या दोन हजारांव्यतिरिक्त आणखी 1400 बॅलेट युनिट्सची आवश्यकता आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी हातकणंगलेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते.

कोल्हापूर मतदारसंघात एकूण 28 इच्छुकांनी अर्ज भरले होते. यांतील एक अर्ज छाननीत बाद झाल्याने उर्वरित 27मधील चार अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने प्रत्यक्षात 23 उमेदवारांना भवितव्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाजीराव खाडे यांनी माघार घेण्यास नकार देत अपक्ष अर्ज कायम ठेवला, तर हातकणंगले मतदारसंघात एकूण दाखल 36मधील चार अर्ज छाननीत बाद झाल्याने उर्वरित 32मधील पाचजणांनी माघार घेतल्याने येथे 27 उमेदवार या निवडणूक मैदानात आहेत.

15 हजार कर्मचारी तैनात

या दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी 15 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी निवडणुकीसाठी तैनात करण्यात आले असून, त्यांना 27 आणि 28 एप्रिल रोजी दुसरे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच 30 एप्रिलपूर्वी मतदारांना ‘बीएलओ’मार्फत मतदार चिट्टय़ांचे वाटप करण्यात येणार आहे.

रिपाइं उमेदवाराची माघार; शाहू छत्रपतींना पाठिंबा

कोल्हापूर मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) उमेदवार रूपा वायदंडे यांनी आज माघार घेतली. त्यांनी महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांना पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा जाहीर केला. ‘देशातील सद्यःस्थितीत संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. शाहू छत्रपती यांचे कार्य सगळ्या समाजासाठी मोठे आहे. म्हणून या निवडणुकीत शाहू छत्रपती यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे वायदंडे यांनी सांगितले.