‘आम्ही काही साधू – संत नाही, मते द्या, विकास घ्या! अजित पवारांची दौंडकरांना खुली ऑफर 

आचारसंहितेचे खुले उल्लंघन करत निवडणूक आयोग खिशात घालून फिरणाऱया भाजपबरोबर आता अजित पवार यांनीही मतांच्या बदल्यात विकास देऊ नाही तर विकास विसरा, अशी खुली ऑफर मतदारांना देणे सुरू केले आहे. देवेंद्र फडणवीसांकडे जलसंपदा आणि ऊर्जा खाते असून माझ्याकडे अर्थखाते आहे. त्यामुळे तिन्ही महत्त्वाच्या खात्यांच्या माध्यमातूनच पाणी इथपर्यंत येणार आहे. पण त्यासाठी 7 तारखेला घडय़ाळाचे बटण दाबायचे. आम्ही काही साधू-संत नाही. तुम्ही मते द्या, आमच्याकडून विकास घ्या. त्यात कुठे कमी पडलो तर बोला…असे म्हणत अजित पवारांनी दौंडमधील मतदारांना सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड तालुक्यात जाहीर सभा घेतली. या वेळी तेथील भाजप नेते राहुल कुल आणि कांचन कुल यांच्यासमवेत दौंड तालुक्यात विकासासाठी काम करणार असल्याचे ते म्हणाले.

म्हणून बारामतीचा विकास रखडला

बारामती मतदारसंघात पाणी आणि इतर महत्त्वाची कामे झाली नाहीत. मात्र आम्ही त्यासाठी प्रयत्न केले. पण गेल्या दहा वर्षांत सत्ताधारी पक्ष नाही तर विरोधातले खासदार निवडून येत असल्यामुळे बारामतीचा विकास झाला नाही, असे अजित पवार म्हणाले.

निधी देतो, पण आधी निवडून द्या!

बारामतीप्रमाणेच दौंडचाही विकास करू. अर्थमंत्री असल्याने माझ्याकडे 6 ते 6.5 लाख कोटींचा निधी आहे. त्यामुळे निधी द्यायला काहीच अडचण नाही. फक्त निधी सत्कारणी लागला पाहिजे, एवढेच मला वाटते. या आधीच्या पुरंदर उपसा सिंचन योजनेची अंतिम मंजुरी माझ्या सहीने आहे. त्यामुळे दौंड तालुक्याच्या विकासासाठी यंदा महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन पवारांनी केले.