Lok Sabha Election 2024 : द्वेषाने भरलेल्या खलीत्याला आम्ही भीक घालत नाही, अंबादास दानवे यांची टीका

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रचारासाठी एक प्रेरणागीत नुकतेच प्रसारीत केले आहे. त्या गीतातील दोन शब्दांवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेत ते शब्द हटविण्यास सांगितले आहे. त्यावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी प्रेरणा गीतातील ‘जय भवानी’ शब्द हटवणार नसल्याचे निवडणूक आयोगाला ठणकावून सांगितले आहे.

निवडणूक आयोगाच्या या आक्षेपावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी देखील निवडणूक आयोगावर टीका केली आहे. दानवे यांनी X वर एक पोस्ट शेअर करत भाजप व निवडणूक आयोगावर टिकास्त्र सोडले. ”निवडणूक आयोगाला आमचे प्रचारगीत ऐकून जळजळ उठली आहे. त्या गाण्यातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत भवानी मातेचे जयघोष यांना चालत नाहीये! महाराष्ट्रात आई भवानीचे नाही तर मग कोणाच्या नावाचा जयघोष करायचा? या असल्या द्वेषाने भरलेल्या खलीत्याला आम्ही भीक घालत नाही. हा भाजपच्या इशाऱ्यावरून महाराष्ट्राची अस्मिता दाबण्याचा प्रकार आहे. सहन करणार नाही, महाराष्ट्र उलट चिडून मतदान करेल.. जय भवानी! जय शिवराय.” अशी पोस्ट दानवे यांनी शेअर केली आहे.