Lok Sabha Election 2024 : दिल्लीच्या नेत्याला गल्ली कळेना; उत्तर मुंबईचे भाजप उमेदवार गोयल यांची अंधेरीत बॅनरबाजी

भ्रष्टाचारी आणि आयात उमेदवारांच्या जिवावर निवडणूक जिंकण्याच्या वल्गना करणाऱया भाजपची ऐन निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच फसगत होत असल्याचे समोर आले आहे. दिल्लीत मंत्रीपद सांभाळत असताना मुंबईशी कोणताही संबंध न ठेवणाऱया पियूष गोयल यांना थेट उत्तर मुंबईत उमेदवारी दिल्यानंतर ‘दिल्लीच्या नेत्याला गल्ली कळेना’ अशी स्थिती झाली आहे. उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियूष गोयल यांनी अंधेरीत बॅनरबाजी केली आहे. या बॅनरबाजीमुळे त्यांनी निवडणूक आचारसंहितेचाही भंग केल्याचा प्रकार घडला आहे. काँग्रेसचे प्रवत्ते सचिन सावंत यांनी या प्रकाराचा ‘एक्स’वर भंडाफोड केला आहे.

निवडणुकीच्या धामधुमीत भाजपकडून मतदारांना भुलवण्यासाठी अनेक आश्वासनांची प्रलोभने दाखवली जात आहेत. यात गेल्या निवडणुकीत शहीदांच्या नावावर मते मागणारा भाजप आता भगवान प्रभू रामचंद्रांच्या नावाने मते मागत असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. अंधेरीतील मोगरा मेट्रो स्टेशनजवळ याबाबत डिजिटल जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. शिवाय रामाच्या नावाखाली मते मागणारे फलकही झळकावण्यात आले आहेत. ‘जो राम को लाए है, हम उनको लाएंगे’ असे आवाहन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू रामचंद्राची आरती करतानाचा भलामोठा फोटोही झळकावण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फोटोच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. रामाच्या आडून मते मागण्याचा हा प्रकार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी कारवाई करा

आचारसंहितेच्या नियमानुसार निवडणूक कार्यक्रमा दरम्यान मतदारांना प्रलोभने दाखवण्यास मनाई असताना भाजपने झळकावलेल्या पोस्टरवर ‘चार कोटी परवडणारी घरे… ही मोदी की गॅरंटी’ असा मजकूर प्रदर्शित केला आहे. शिवाय अबकी बार मोदी सरकार असा संदेश देत ‘एनडीए’ला विजयी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. त्यामुळे आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी भाजपवर निवडणूक आयोग, प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली आहे.