Lok Sabha Election 2024 : नाशिक सोडा, शिरूरमधून लढा; मुख्यमंत्र्यांची ऑफर, भुजबळांचा दावा

महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषेद घेत नाशिकची जागा लढवणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही येथील उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांनी या जागेसाठी फिल्डिंग लावली असून, अजित पवार गटानेही या जागेवरील दावा सोडलेला नाही. भाजपचे स्थानिक पदाधिकारीही जा जागेसाठी आग्रही आहेत. हा तिढा सुटलेला नसतानाच आता छगन भुजबळ यांनी मोठा दावा केला आहे.

नाशिकच्या जागेसाठी माझ्या नावाचा विचार झाला होता. दिल्लीतील बैठकीमध्येही माझ्या नावाचीच चर्चा झाली आणि मलाच ही जागा लढवण्यास सांगितले होते. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता आणि त्यांनी नाशिकची जागा सोडून शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. शिरूर मतदारसंघात ओबीसी आणि नाभिक समाजाची लोकं मोठ्या संख्येने असल्याने तिथून तुम्ही निवडणूक लढवा अशी गळ मुख्यमंत्र्यांनी घातली होती. मी तिथे गेलो असतो तर नाशिकचा तिढा सुटला असता, असे छगन भुजबळ म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ओबीसी समाज महाराष्ट्र आहे. मात्र माझा संबंध प्रामुख्याने नाशिकशी असून मी इथला आमदार, पालकमंत्री आहे. त्यामुळे मी नाशिक सोडून कुठेही जाणार नाही हे स्पष्ट केले.

महायुतीत भुजबळांची खूप अवहेलना होत आहे; जयंत पाटील यांनी लगावला टोला

दरम्यान, याबाबात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी गौप्यस्फोट केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरूर लोकसभा मतदारसंघात माझ्याविरोधात छगन भुजबळ यांना रिंगणात उतरवणार होते. मात्र त्यांनी नकार दिल्याने शिवाजी आढळराव पाटलांना अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली, असे कोल्हे म्हणाले होते.