गुलिगत धोका? 10 वर्षात भाजप उमेदवाराचे वय 15 वर्षांनी वाढले, ‘सपा’ची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचाराला उत्तर प्रदेशमधील फिरोझाबाद येथील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विश्वजित सिंह यांच्या वयावरून उठलेल्या वादळाची फोडणी मिळाली आहे. विश्वजित सिंह यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपले वय 60 असल्याचे नमूद केले होते. मात्र यंदाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी आपले वय 75 असल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ गेल्या 10 वर्षांत त्यांचे वय 15 वर्षांनी कसे वाढले? असा सवाल समाजवादी पार्टीने उपस्थित केला आहे.

विश्वजित सिंह यांनी 2014 मध्ये बहुजन समाज पार्टीकडून लोकसभा निवडणूक लढली होती. या निवडणुकीत त्यांच्यापुढे समाजवादी पार्टीच्या अक्षय यादव यांचे आव्हान होते. अक्षय यादव हे अखिलेश यादव यांचे चुलत भाऊ असून रामगोपाल यादव यांचे सुपुत्र आहेत. त्यावेळी अक्षय यादव यांच्यापुढे विश्वजित सिंह यांचा निभाव लागला नाही आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर 2019च्या निवडणुकीतही अक्षय यादव यांनी विजय मिळवला होता. आता फिरोजाबादमधून सपाने त्यांना तिसऱ्यांदा रिंगणात उतरवले आहेत. त्यांच्यापुढे विश्वजित सिंह यांचे आव्हान आहे.

2014 ची लोकसभा निवडणूक लढताना विश्वजिंत सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर आपले वय 60 वर्ष असल्याचे म्हटले होते. यंदा हेच विश्वजित सिंह भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढत असून त्यांनी आपले वय 75 असल्याचे म्हटले आहे. यावर समाजवादी पार्टीने आक्षेप घेतला आहे.

समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवराज सिंह यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. विश्वजित सिंह यांच्या वयाचा मुद्दा आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांपुढे मांडला आहे. भाजप उमेदवार विश्वजिंत सिंह यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना वयाबाबत चुकीची माहिती दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे भाजप उमेदवार विश्वजिंत सिंह यांचे वकील राजेश कुमार कुलश्रेष्ठ आणि आलोक कुलश्रेष्ठ यांनी जाणूनबुजून वयाचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचे म्हटले. प्रतिज्ञापत्रावर जन्मतारखेचा रकाना नसतो. त्यामुळे विश्वजिंत सिंह यांचे वर्तमान वय 75 हे खरे आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याने सपाची मागणी फेटाळून लावली आहे. विश्वजित सिंह यांनी यंदा प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती योग्य असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.