मी अजून म्हातारा झालेलो नाही, भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद माझ्यात आहे; शरद पवारांची फटकेबाजी

पुण्यातील खेड तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी जबरदस्त राजकीय फटकेबाजी केली आहे. मी अजून म्हातारा झालो नाही. भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद माझ्यात आहे, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या या वक्तव्याचा नेमका रोख कोणाकडे होता, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत.

शरद पवारांनी त्यांच्या वयाचा उल्लेख करणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांना सांगितले की, तुमच्याबाबत माझी एक तक्रार आहे. ती तक्रार अशी आहे की, तुम्ही तुमच्या सगळ्या भाषणांमध्ये मी 82 वर्षांचा झालो, मी 83 वर्षांचा झालो, असा उल्लेख करता. पण तुम्ही माझं काय बघितलंय. मी काही अजून म्हातारा झालो नाही, असे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले. लय भारी लोकांनासुद्धा सरळ करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. तुम्ही काही चिंता करू नका. तुमचे जे काही दुखणे असेल ते सगळे दुखणे दूर करण्यासाठी जे करायला लागेल? ते सगळे करू आणि नवीन इतिहास घडवू, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच या वक्तव्यातून त्यांनी नेमका कोणावर निशाणा साधला आहे. याचीही चर्चा होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर अजित पवार यांनी आता त्यांनी घरी बसावे, त्यांचे वय झाले आहे, असे वक्तव्य केले होते. तसेच अजित पवार गटातील अनेक नेतेही शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करतात. त्यामुळे शरद पवार यांचा रोख थेट अजित पवार यांच्यावर आहे की नेमका कोणाकडे आहे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत.