महाराष्ट्रावर पाणीटंचाईचे सावट, गतवर्षीच्या तुलनेत यंदा 20 टक्के कमी पाणीसाठा

महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमध्ये गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी जितका पाणीसाठा उपलब्ध होता त्यापेक्षा 20 टक्के कमी पाणीसाठा यावर्षी उपलब्ध आहे. ऑगस्ट 2022 च्या तुलनेत ऑगस्ट 2023 च्या अखेरीस महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमध्ये 204 टीएमसी कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने सरासरीही न गाठल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. एका शहराला 10 वर्षांसाठी जितका पाण्याचा कोटा असतो तितका हा तुटवडा असल्याचे सांगण्यात आले आहे.

पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील प्रमुख जलाशयांची पाणीसाठ्याची एकूण क्षमता ही 1026 टीएमसी इतकी असून सध्या या धरणांमध्ये 730 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी राज्यातील प्रमुख धरणांमध्ये 934 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक होता. विभागवार नजर टाकल्यास छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची परिस्थिती सगळ्यात बिकट आहे. यावर्षी ऑगस्टच्या शेवटापर्यंत इथल्या धरणांमध्ये 37 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच सुमारास या धरणांमध्ये 86 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. पुणे विभागात यावर्षी ऑगस्ट अखेरपर्यंत 76 टक्के पाणीसाठा शिल्लक असून गेल्यावर्षी याच सुमारास हा पाणीसाठा 95 टक्के इतका होता. महाराष्ट्रातील कोकण हा एकमेव विभाग ज्यामध्ये यावर्षी ऑगस्ट अखेर पाणीसाठ्याची स्थिती चांगली आहे असे म्हणता येईल. या भागातील प्रमुख धरणांमध्ये गेल्या वर्षी याच दिवशी 90% इतका साठा होता, त्या तुलनेत यावर्षी 92% पाणीसाठा उपलब्ध आहे.

“राज्यातील धरण क्षेत्रात जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला असला तरी, ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली होती. यामुळे राज्यासमोर पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. खडकवासला परिसरातील चार धरणांतून एक टीएमसी देखील पाणी सोडण्यात आलेले नाहीये, यावरून आपल्याला परिस्थिती किती बिकट आहे याचा अंदाज येऊ शकतो. पुणे जिल्ह्यातील धरणांमधून होणारा विसर्ग उजनी धरणापर्यंत पोहचत असतो. उजनी धरण गेल्या वर्षी 100 टक्के भरलं होतं, यंदा उजनी धरणात फक्त 16 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरणात गेल्या वर्षी याच तारखेला 94 टक्के पाणीसाठा होता. यावर्षी या धरणात 81 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिकमधील गंगापूर हे महत्त्वाचं धरण असून या धरणात गेल्यावर्षी याच सुमारास 96 टक्के पाणीसाठा होता. यावर्षी हा पाणीसाठा 91 टक्के इतका आहे.