आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा तरुणांवर पोलिसांचा बेछूट, अमानुष लाठीहल्ला

जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सनदशीर मार्गाने सुरू असलेले आंदोलन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांनी रझाकारी मार्गाने चिरडले. सकाळी आंदोलकांशी चर्चा करणाऱया पोलिसांनी दुपारी आंदोलकांवर घेरून अमानुष लाठीहल्ला केला. आंदोलक तरुणांसह महिला, लहान मुले, वृद्धांवर रक्तबंबाळ होईपर्यंत पोलिसांनी लाठय़ा चालवल्या. यावेळी तुफान दगडफेक झाली. यात अनेकजण जखमी झाले. पोलिसांपासून वाचण्यासाठी आंदोलकांनी राम मंदिरात धाव घेतली. पोलिसांनी अश्रुधुराचा बेसुमार वापर केला. एवढेच नाहीतर हवेत गोळीबार करून प्रचंड दहशत निर्माण केली. दरम्यान, या घटनेचे मराठवाडय़ात संतप्त पडसाद उमटले असून छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. शनिवारी जालना व बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

जालना जिल्हय़ाच्या घनसावंगी तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला थेट आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी चार दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील यांच्यासह काही कार्यकर्ते उपोषणाला बसले होते. उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु जरांगे यांनी ती फेटाळली. त्यानंतर प्रशासनानेही जरांगे यांना विनंती केली. ही विनंतीही जरांगे यांनी फेटाळली. उपोषण मागे घेऊ नका, निदान उपचार तरी घ्या असा आग्रह प्रशासनाने केला. त्याला मनोज जरांगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

अंधारात पोलिसांची मिंधेगिरी

मराठा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला असतानाच पोलिसांनी रात्रीच्या अंधारात मिंधेगिरी करण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री आंतरवालीत मोठा फौजफाटा धडकला. बळाचा वापर करून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु गावकऱयांनी रुद्रावतार धारण करताच पोलीस, प्रशासनाने माघार घेतली.

पोलीस, प्रशासनाच्या विरोधात संताप

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे कळताच सर्वत्र संतापाची लाट उसळली. या आंदोलनाला आंतरवालीसह पंचक्रोशीतील अनेक गावांनी पाठिंबा दिला. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी उपोषणस्थळी अनेक गावातून हजारो मराठा समाजाचे लोक आले. यात महिला, वृद्ध, लहान मुलांचाही समावेश होता. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वडीगोद्री, शहागड, विहामांडवा, उमापूर, तीर्थपुरी, साष्टपिंपळगाव, हादगाव, शहापूर, मादळमोही, कोळगाव, मांजरसुबा, गोंदी, धोंडराई आदी गावात शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. वडीगोद्री ग्रामपंचायतने ग्रामसभेत ठराव घेऊन उपोषणाला पाठिंबा दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)


उपोषणस्थळी दगडविटांचा खच

पोलिसांनी रझाकारी करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याने मराठा कार्यकर्ते संतापले. त्यानंतर उपोषणस्थळी दगडफेक सुरू झाली. यातही काही जण जखमी झाले. पोलिसांपासून बचावासाठी लोक शेजारी असलेल्या राम मंदिरात आश्रयाला गेले. उपोषणस्थळी दगडविटांचा खच पडला. पोलिसांनी लाठीमार करत असतानाच अश्रुधुराचा वापर केला. त्यानंतर हवेत गोळीबार करून प्रचंड दहशत पसरवण्यात आली. पोलिसांच्या लाठीहल्ल्यात अनेक जण जखमी झाले. यात काही वृद्ध, लहान मुलांचाही समावेश आहे.

वाहनांची जाळपोळ

पोलिसांनी निजामी करून मराठा आंदोलन चिरडल्याचे वृत्त वाऱयासारखे पसरले. मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर तीन वाहने पेटवून दिली. जालना-संभाजीनगर तसेच बीड मार्गावरही वाहनांची जाळपोळ करण्यात आली. परिवहन महामंडळाच्या 11 बस पेटवून देण्यात आल्या. काही वाहनांवर दगडफेकही केली.

बीड, जालन्याकडे जाणाऱया बस रद्द

आंतरवाली येथे पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारानंतर ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. धुळे-सोलापूर महामार्गावर वाहनांची जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरहून बीड, जालन्याकडे जाणाऱया सर्व बस रद्द केल्या.

उपोषण स्थळाला पोलिसांचा घेराव

आमदार राजेश टोपे, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार चंद्रकात शेळके, पोलीस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यात काही तोडगा निघाला नाही. त्यानंतर दुपारी अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार शेळके हे प्रचंड फौजफाटय़ानिशी गावात दाखल झाले. दुसऱयांदा चर्चा सुरू करण्यात आली. सोबत वैद्यकीय पथकही आणण्यात आले होते. तपासणीच्या नावाखाली जरांगे यांना ताब्यात घेण्याचा प्रशासनाचा डाव होता. हे लक्षात येताच उपोषणस्थळी एकच हलकल्लोळ उडाला. कार्यकर्त्यांनी जरांगे यांना ताब्यात घेण्यास विरोध केला. कार्यकर्त्यांनी विरोध करताच शेकडो पोलीस मंडपात घुसले. पोलिसांनी दिसेल त्याला लाठय़ांनी बेदम झोडपून काढले. महिला, लहान मुले, वृद्धांनाही सोडले नाही.

आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न – वडेट्टीवार

मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर समाजाची फसवणूक सुरू आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही हे माहिती असूनही राज्य सरकारने खोटे आश्वासन दिले. पोलिसांच्या माध्यमातून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

पोलीस बळाचा बेछूट वापर – दानवे

आंतरवाली सराटी येथील मराठा कार्यकर्त्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी बळाचा बेछुट वापर केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. शांततेच्या मार्गाने या सरकारच्या काळात आंदोलन करायचेच नाही का, याचे उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे असे ते म्हणाले.

दोषी पोलिसांवर कारवाई करणार – अजित पवार

जालना जिह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळय़ांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका मांडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आंदोलकांसोबत असल्याचे सांगितले.

पोलिसांवर दगडफेक झाल्याने लाठीमार – देवेंद्र फडणवीस

आंतरवाली सराटी येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. उपोषणकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी विनंती केली होती. पण उपोषणकर्ते उपोषणावर ठाम होते. उपोषणकर्त्याची प्रकृती खालावत असेल तर त्याला उपचार देणे सरकारची जबाबदारी आहे. त्यानुसार आज पोलीस तेथे गेले. परंतु पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यात पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. लाठीमार केला नसता तर पोलिसांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले असते, असा दावा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

दंगेखोरांवर कारवाई करणार

सणासुदीचे दिवस आहेत. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी शांतता पाळावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी केले.

लाठीमाराची घटना दुर्दैवी

लाठीमाराची घटना दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी तसेच पोलीस प्रशासनाकडून या घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

गृह खात्याने अतिरेकी भूमिका घेणे चुकीचे- शरद पवार

आंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. उपोषण थांबवावे असा पोलिसांचा दुराग्रह होता. आंदोलक आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली होती. पण पोलिसांनी नाहक लाठीहल्ला केला. गृह खात्याने अशी अतिरेकी भूमिका घेणे चुकीचे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. गृहमंत्र्यांच्या मनात काही घटकांबद्दल असलेली भावना पोलिसांच्या कृतीतून दिसली, असा टोला लगावला. या अमानवीय घटनेला राज्याचे गृहमंत्रालय जबाबदार असून महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे, अशी तोफ पवार यांनी डागली.

महाराष्ट्र फार काळ हे सहन करणार नाही, आदित्य ठाकरे यांचा संताप

महाराष्ट्रात स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करणंही अशक्य झालंय, दडपशाही करणारं मिंधे-भाजपा सरकार युवकांच्या जिवावर उठलंय. जालन्यातील लाठीहल्ला  संतापजनक आहे. लोकशाही चिरडून हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे, असा संताप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. आधी वारकऱयांवर, आता मराठा तरुणांवर हल्ला केला गेला. मिंधे-भाजपा राजवट म्हणजे सध्याची मुघलाईच आहे. आपलं राज्य लुटायचं, दिल्लीसमोर राज्य झुकवायचं, सरकारं पाडायची… निर्लज्जपणाचा कळस गाठला गेलाय. महाराष्ट्र फार काळ हे सहन करणार नाही, परिवर्तन अटळ आहे, असे त्यांनी ठणकावले.