रसिकांनो, तुमचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही; अशोक सराफ महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्रातील प्रेक्षक अत्यंत बुद्धीमान आणि खडूस आहे. त्यांना आवडले तर ते कलाकाराला डोक्यावर घेतात नाहीतर विचारणारसुद्धा नाहीत. प्रेक्षकांना काय आवडेल, याचे भान ठेऊन कलाकाराला नेहमी काम करावे लागते. हाच दृष्टीकोन मी कायम जपला. शेवटी, प्रेक्षक हाच सर्वश्रेष्ट आहे. तुम्ही आमची कलाकृती बघायला आला नाहीत तर आम्हाला घरीच बसावे लागेल. प्रेक्षकांनो, तुमचे हे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. तुम्हा सर्वांचे प्रेम, आशीर्वाद असेच राहूदेत, असे भावोद्गार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी काढले.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे 57 व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन गुरुवारी सायंकाळी वरळी येथील डोम, एनएससीआय येथे करण्यात आले होते. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना गौरविण्यात आले.

सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याचा आनंद
पुरस्काराला उत्तर देताना अभिनेते अशोक सराफ म्हणाले, महाराष्ट्र ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. महाराष्ट्रातला एक नंबरचा पुरस्कार आज मला प्रदान करण्यात आला त्याबद्दल मला खूप आनंद होतोय. आजवर महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्यांना मिळाला त्या दिग्गजांची यादी खूप मोठी आहे, त्यांच्या पंक्तीत मला नेऊन बसवले त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार. माझी चित्रपटसृष्टीतील पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत ज्यांनी कळत नकळत मला मदत केली. त्या छोटया वर्करपासून ते दिग्दर्शकापर्यंत सर्वांचे आभार. या सगळ्यांनी मला पाठिंबा दिला नसता तर मी या पदापर्यंत पोहोचू शकलो नसतो. ही सगळी त्यांची किमया, असेही ते म्हणाले.

कलाकारांच्या परफॉर्मन्सने लावले चार चाँद
वैभव तत्ववादी याने ‘गजानना गजानना’, ‘देवा श्री गणेशा’ गाण्यावर केलेला दमदार परफॉर्मन्सने कार्यक्रमाची दमदार सुरुवात झाली. संतोष पवार, प्रियदर्शन जाधव, सुप्रिया पाठारे यांनी सादर केलेले धम्माल विनोदी स्किट सादर केले. संस्कृती बालगुडे आणि शुभंकर तावडे यांनी अशोक सराफ यांच्या चित्रपटातील गाजलेल्या गाण्यावर परफॉर्मन्स करत उपस्थितांना अक्षरशः थिरकायला लावले. अमृता खानविलकर आणि वैदेही परशुरामी यांनी सादर केलेली लावणीची जुगलबंदी भाव खाऊन गेली. तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने परफॉर्मन्समधून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मानवंदना दिली.