फेसबुकवर सूत जुळलं, विवाहितेने मुलासह प्रियकराचं घर गाठलं; पदरी धोका पडताच पुन्हा नवऱ्याला कवटाळलं

>> प्रसाद नायगावकर

सोशल मीडियावर सूत जुळलं, दोन मुलांच्या आईने नवऱ्याला सोडून दोन अपत्यांपैकी एकाला घेऊन प्रियकराचे घर गाठले… काही दिवस सुखात गेले, पण प्रियकराने गोड बोलून गंडवले. खात्यातील पाच लाख काढून घेतले, एवढेच नाही तर मंगळसुत्र आणि कानातलेही विकले… शारीरिक, मानसिक त्रास सुरू झाला. अखेर महिलेने आपबिती नवऱ्याला कळवली आणि अखेर पोलिसांच्या मदतीने तिची सुटका झाली. एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशी ही घटना यवतमाळमध्ये घडली आहे.

यवतमाळ येथे दोन चिमुरडे आणि पती-पत्नीचा संसार सुखाने सुरू होता. कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी विश्वास (बदललेले नाव) इमानेइतबारे प्रयत्न करत होता, तर नवारा आणि मुलं बाहेर गेल्यानंतर सीमा (बदललेले नाव) सोशल मीडियावर वेळ घालवत होती. याच नादातून फेसबुकवरून तिची ओळख नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील आनंद (बदललेले नाव) झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. विवाहिता असतानाही सीमा आनंदच्या प्रेमात आकंठ बुडाली. शेवटी तिने विश्वासाचे नाते तोडत एका अपत्याला घेऊन प्रियकराचे घर गाठले. याची कल्पना नसलेल्या विश्वासने अवधुतवाडी पोलीस स्थानकात पत्नी आणि अपत्य हरवल्याची तक्रार दाखल केली.

दुसरीकडे सीमा आणि आनंदचे काही दिवस सुखात गेले. मात्र नंतर आनंदने खरे रुप दाखवण्यास सुरुवात केली. आनंद सीमाकडे पैशांचा तगादा लावू लागला. विश्वासने छोटे दुकान टाकण्यासाठी पै-पै जोडून सीमाच्या खात्यात 5 लाख रुपये जमा केले होते. ते पैसेही आनंदने जबरदस्तीने काढून घेतले. गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र आणि कानातील दागिनेही विकून खाल्ले. मोबाईलही हिसकावून घेतला. सीमाकडून आता आर्थिक फायदा दिसत नसल्याने आनंदने तिला मारझोड सुरू केली. अखेर हा छळ असह्य झाल्याने सीमाने विश्वासला आपबिती सांगितली. विश्वासने तिला मोठ्या मनाने माफ करत घरी आणण्याचा निर्णय घेतला आणि लागलीच हा प्रकार अवधुतवाडी पोलीस स्थानकाचे पोलीर निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या कानावर घातला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी तातडीने पावले उचलली आणि सीमा व तिच्या अपत्याला यवतमाळ येथे सुखरूप पोहोचवले.

सोशल मीडियावर समोरची व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे सांगणे कठीण असते. तसेच समोरच्याचा स्वभाव सांगणे किंवा त्याचे मनसुबे सांगणे हे सुद्धा कठीण असते. त्यामुले आपली व्यक्तिगत माहिती किंवा फोटो अशा माध्यमांवर कोणाला पाठवू नये. आपला पासवर्ड अथवा खासगी माहिती कोणालाही सांगू नये. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक, ब्लॅकमेलिंग, लूट अशा सायबर गुन्हांना आपण बळी पडू शकता.

डॉ.पवन बनसोड , पोलीस अधीक्षक