मिंधेंच्या पदाधिकाऱयाने बोगस आयकर अधिकारी बनून व्यावसायिकाला लुटले; शीव येथे 18 लाखांचा गंडा

 

‘गतिमान सरकार’ असा टेंभा मिरवणाऱ्या मिंधेंच्या पदाधिकाऱ्याने शीवमध्ये चक्क बोगस आयकर अधिकारी बनून व्यावसायिकाला 18 लाखांचा गंडा घातल्याचा संतापजनक प्रकार शीवमध्ये समोर आला आहे. आठ जणांच्या टोळक्याकडून ही लूट करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर शीव पोलिसांनी या सर्वांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीत मिंधे गटाचा कोल्हापूर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा संपर्कप्रमुख राजाराम मांगले आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मिंध्यांची ‘गतिमानता’ आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शीव पूर्वेकडील टी. बी. चिदंबरम मार्गावरील प्रेमसदन इमारतीत पटवा कुटुंबीय राहतात. रामकुबेर पटवा यांचा राखी बनविण्याचा व्यवसाय आहे. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता या टोळीत चार जण बोगस आयकर अधिकारी बनून पटवा यांच्या घरावर धडकले. त्यांनी आयकर अधिकारी असल्याची ओळख सांगितल्यामुळे पटवा यांनी त्यांना घरात प्रवेश दिला. पटवा कुटुंबीयांचा विश्वास पटावा यासाठी त्यांनी आयकर अधिकारी असल्याची बोगस ओळखपत्रेही दाखवली. मात्र अचानक आयकर अधिकारी घरावर आल्याने पटवा कुटुंबीय गोंधळले. या भामटय़ांनी सर्वांना एकत्र बसकले. सर्वांचे मोबाईल बंद केले. तुमच्या घरात मोठय़ा प्रमाणात रोकड, दागदागिने अशी बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती असून ते सर्व समोर आणून ठेवा, असे त्या भामटय़ांनी धमकावले. यावेळी पटवा यांची 18 लाखांची रोकड घेऊन ते बोगस आयकर अधिकारी पसार झाले.

पोलिसांनी 48 तासांत मुसक्या आवळल्या
याप्रकरणी तक्रार दाखल होताच शीव पोलिसांनी वेगाने तपास करून या लूट प्रकरणातील संतोष पटले, राजाराम मांगले, अमरदीप सोनकणे, भाऊराक इंगळे, सुशांत लोहार, शरद एकाकडे, अभय कासले, रामकुमार गुजर अशा एकूण आठ भामटय़ांच्या मुसक्या आवळल्या. या झोलर टोळीतील राजाराम मांगले हा मिंधे गटाचा पदाधिकारी असून खासदार राहुल शेकाळे यांच्या मर्जीतला आहे. त्याच्याकर अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्र निरीक्षक पदाची जबाबदारीदेखील आहे.

मांगलेची गुन्हेगारी पार्श्वभूमी

राजाराम मांगले हा मुळात गुन्हेगारी प्रकृत्तीचा आहे. त्याने आतापर्यंत अनेक झोल केल्याचे सूत्रांकडून समजते. यावेळी तो शीव येथील व्यावसायिकाच्या घराकर आयकर अधिकारी म्हणून छापा टाकण्यात आघाडीकर होता. परिसरात दहशत निर्माण करण्याचे काम राजारामच्या माध्यमातून केले जायचे असे मानखुर्दमधील नागरिक सांगतात.