अजित पवार आणि समर्थकांना मंत्रिपदाची खैरात; मिंधे गटाला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही

राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता शिंदे गट व भाजपच्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले होते. मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शिंदे व भाजपच्या आमदारांशिवाय मंत्रिमंडळ विस्तार झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थक आमदार नाराज झाले आहेत. राजभवनावरील आजच्या शपथविधीच्या सोहळय़ात मिंधे गटाची नाराजी स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसत होती.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात होईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीच जाहीर केले होते. त्यामुळे भाजप व शिंदे गटातील आमदारांना मंत्रिमंडळातील समावेशाचे वेध लागले होते. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल या आशेवर ते होते. पण अचानक झालेल्या राजकीय घडामोडीनंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर त्यांच्यासोबतच्या आठ आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. त्यामुळे शिंदे-फडणवीस गटाच्या आमदारांनी आखलेल्या मंत्रीपदाच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे. त्याची प्रचीती राजभवनावरील शपथविधी सोहळय़ाच्या वेळेस आली. स्वतः एकनाथ शिंदे यांनाही त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी लपवता आली नाही. मिंधे गटातील इच्छुक आमदारही नाराज होते. पण उघडपणे प्रतिक्रिया व्यक्त करता येत नसल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हतबलता स्पष्टपणे दिसत होती.

शिंदेंना जाहिरात भोवली
काही दिवसांपूर्वी शिंदे यांनी एका सर्व्हेचा दाखला देत सर्व वर्तमानपत्रांत जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. त्यात ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ असा उल्लेख केला होता. त्यात एकनाथ शिंदे यांना राज्यातील 26.1 टक्के जनतेची लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पसंती तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के पसंती असल्याचे नमूद केले होते. पण शिंदे यांच्या बाजूने दाखवलेला कौल देवेंद्र फडणवीस यांना अजिबात आवडला नव्हता, पण फडणवीसांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली नव्हती. या जाहिरातीनंतर पालघरमध्ये झालेल्या जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावर शिंदे-फडणवीस काही मिनिटे एकमेकांशी बोलले नव्हते. त्यानंतर शिंदे-फडणवीसांमध्ये पूर्वीसारखा सुसंवाद दिसून येत नव्हता. आता तर अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांना थेट सत्तेत घेऊन राज्यातल्या सत्तासंघर्षात भाजपचे सरकार मजबूत करून एकनाथ शिंदे यांना शह दिल्याचे बोलले जात आहे.

मिंधे गटाच्या हाती धुपाटणे
राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्याने आम्ही शिवसेनेपासून फारकत घेतली असा दावा करणाऱ्या मिंधे गटाची आजच्या घटनेनंतर गोची झाली आहे. शिवसेनेशी गद्दारी करून त्यांनी सरकार स्थापन केले खरे, पण आता राष्ट्रवादीचाच गट सरकारमध्ये सामील झाल्याने मिंधे गटातील अनेक आमदारांचे मंत्रीपदाचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे ‘तेलही गेले आणि तूपही गेले, हाती आले धुपाटणे’ अशी त्यांची अवस्था झाली आहे.

आपली खिल्ली उडवली जात असल्याने मिंधे गटाच्या आमदारांनी आता सारवासारव सुरू केली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी याच क्षणासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला होता, असे हास्यास्पद उत्तर दिले आहे तर आमदार संजय शिरसाट यांना आता काय करावे? असा प्रश्न पडला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादी सोडून भाजप किंवा आमच्याकडे आले तर त्यांचे स्वागत आहे, मात्र राष्ट्रवादीचा गट घेऊन ते भाजपसोबत जाणार असतील तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, असा इशारा त्यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. शिंदे आता सत्तेतून बाहेर पडणार का? या सवालाचा भडिमार आता शिरसाट यांच्यावर होत असून त्यावर त्यांनी मौन धारण केले आहे. मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले भरत गोगावले, संजय बांगर, सदा सरवणकर यांचीही गोची झाली आहे.

महाराष्ट्रात लवकरच नवा मुख्यमंत्री
ज्यांना तुरुंगात पाठविणार होते, त्यांना मंत्रिपदाचे दरवाजे खुले केले गेले. आता भाजपचे ते लोक काय म्हणणार, असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. शिंदे हे फार काळ मुख्यमंत्रीपदावर राहणार नाहीत, ते व त्यांच्यासोबतचे आमदार अपात्र ठरतील व लवकरच महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल, हे आजच्या शपथविधीमुळे स्पष्ट झाले आहे. एक इंजिन बंद पडणार असल्याने दुसरे इंजिन भाजपकडून जोडण्यात आले आहे. शरद पवार यांच्याशी माझे बोलणे झाले आहे, ते खंबीर आहेत. जे शिवसेनेच्या बाबतीत घडवले तेच आज राष्ट्रवादीच्या बाबतीत घडवले. मात्र, हे लोकांना आवडलेले नाही, आम्ही खंबीरपणे उभे राहू. भविष्यामध्ये आम्ही सर्व जण एकत्र राहत महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवू, असेही राऊत यांनी नमूद केले.

‘त्या’ 40 जणांच्या गँगची कीव येते
‘मला त्या 40 जणांच्या गँगची कीव येते. अगोदरच मंत्री होण्यावरून लाथाळय़ा होत्या, आता तर मंत्रीपदाची स्वप्ने गाठोडय़ात बांधा आणि टाका मंत्रालयाच्या माळ्यावर..!’ असे ट्विट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे.

सरकार स्थिर नसल्यानेच फोडाफोडी सुरू -अशोक चव्हाण
भाजपचे फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याने सरकार स्थिर नसल्याचे आज स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरणार असल्याची चर्चा असून यावर भविष्यात काहीही होऊ शकते. या घडामोडीविषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा झाली आहे. काँग्रेस, शिवसेना व शरद पवार या तीनही पक्षांची बैठक होऊन विरोधी पक्षनेता हा कोणत्या पक्षाचा हे ठरविणार असल्याचेही ते म्हणाले.

आजची घटना लोकशाही, राज्यघटनेसाठी दुर्दैवी
सन 2014 पासून देशात लोकशाही, राज्यघटना आणि पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होतो आहे, हे काळजी लावणारे आहे. घडलेल्या सर्व घटना जनता पाहते आहे. याबाबत जनताच निर्णय करणार असून, जनतेचे न्यायालय सर्वश्रेष्ठ आहे. आजची घडलेली घटना ही लोकशाही व राज्यघटनेसाठी दुर्दैवी आहे, अशी खंत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. भाजपाची कार्यपद्धती ही सत्ता मिळवण्यासाठी काहीही करण्याची आहे. जे कालपर्यंत एकमेकांवर टीका करत होते; ते आज एकत्र आले आहेत, असेही ते म्हणाले.

आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला – राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आजच्या सत्तानाटय़ावर टीका केली आहे. ‘‘आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला,’’ असे राज ठाकरे यांनी ट्विटरवर म्हटले आहे. शरद पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरीपण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच, असा दावाही त्यांनी केला आहे.

राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. ‘‘सध्या शिंदेंना दिले जाणारे अवास्तव महत्त्व महाराष्ट्र भाजपला रुचत नव्हतं, त्यावर अनायासे उतारा शोधला गेला. यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं,’’ असे राज ठाकरे यांनी नमूद केले आहे.

‘‘महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे याची खात्री असल्यामुळे या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरू राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार?’’ असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.