नाना शंकरशेट यांच्या स्मारकाला अद्याप निधी नाही हे सरकारचे दुर्दैव,सुनील प्रभू यांचा घणाघात

मुंबईचे आद्यशिल्पकार नाना शंकरशेट यांच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने होत आहे. हा निधी देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत हे अत्यंत दुर्दैवी आहे. वडाळा येथील  त्यांच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनातच करावी, अशी जोरदार मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली.

नगरविकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना सुनील प्रभू यांनी नाना शंकरशेट स्मारक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडय़ा आदी मुद्दय़ांकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, गोडबोले समितीने जे निकष घालून दिले होते त्या निकषाच्या बाहेर जाऊन पुरवणी मागण्या मांडल्या आहेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडय़ांचा मुद्दा उचलून धरताना ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ज्यांनी सात हजार रुपये भरले आहेत त्यांना जमीन उपलब्ध झालेली नाही. मागील सरकारने शासकीय जमिनी, वन जमिनी व खासगी जमिनींवर 2011पर्यंतच्या वास्तव्याचा अधिकार दिल्यानंतर सर्व्हेअंतर्गत जी घरे उपलब्ध झाली, ज्या झोपडय़ा निर्देशित झाल्या या सर्वांचे पुनर्वसन शासनाच्या जमिनीवर मोफत करून देण्याबाबत सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे. या उद्यानातील वीस हजार झोपडपट्टीवासीयांना अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही. या उद्यानातील ज्या रहिवाशांनी सात हजार रुपये भरले आहेत, ज्यांना घरे मिळाली नाहीत आणि वास्तव्याचा अधिकार लागू होतो अशा सर्वांना घरे उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. जोपर्यंत नाना शंकरशेठ यांच्या स्मारकाला सरकार व महापालिका निधी देत नाही तोपर्यंत मागणी करीत राहणार असे ते म्हणाले.

दिंडोशी मतदारसंघात प्रसूतीगृहासाठी एक भूखंड राखीव आहे. दिंडोशीतील लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे प्रसूतीगृह व नवजात अर्भकांसाठी अतिदक्षता विभाग उभारावा म्हणून मी सातत्याने मागणी करीत आहे. पण पालिकेने दोन वर्षांत बजेटमध्ये कोणतीही तरतूद केलेली नाही. त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करून प्रसूतीगृह बांधावे. अरुंद रस्ते रुंद करण्यासाठी गोरेगाव-मुलुंड लिंक व इतर रस्ते आहेत. दिंडोशी मतदारसंघात एकाच महिन्यात तीन वेळा आग लागली. अग्निशमन दलाचे बंब पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी रस्ते रुंदीकरणाचे आदेश दिले आहेत. या भागात 120 फुटांच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी प्रभूंनी केली.