तुम्हाला स्वत:च्या मुलाप्रमाणे जपलेलं, का पत्करली गुलामी? पवारांचा वळसे-पाटलांना परखड सवाल

महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्रीपदाची जबाबदारी असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनीही बंडखोरी केली आणि अजित पवारांसोबत ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. राजभवन येथे अजित पवार आणि इतर बंडखोर आमदारांसह वळसे-पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी वळसे-पाटलांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीची चिरफाड करत अजून काय पाहिजे? असा सवालही केला.

वळसे-पाटलांना शरद पवार यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याकडून अपेक्षित नव्हती, असे रोहित पवार यांनी म्हटले.

प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहीलच, परंतु वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का? असा सवालही रोहित पवार यांनी केला.

जमिनीपेक्षा आपलं ‘विमान’ हवेतच जास्त असायचं, रोहित पवार यांचा प्रफुल्ल पटेलांना टोला

या ट्विटसोबतच त्यांनी वळसे- पाटील यांना आतापर्यंत पक्षाकडून कोण कोणती पदं देण्यात आली याची माहितीही एका फोटोतून दिली आहे. शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक, आतापर्यंत सात वेळा आमदार, 1990 मध्ये आंबेगाव मतदारसंघातून आमदार, 1999-2002 उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, 2003-2004 ऊर्जामंत्री, 2004-2005 वैद्यकीय शिक्षणमंत्री, 2005-2008 वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, 2008-2014 विधानसभा अध्यक्ष, 2019-2022 कामगार व राज्य उत्पादन शुल्कमंत्री, गृहमंत्री. हे सगळं वाचल्यावर लोकं म्हणतील की, असा अन्याय आमच्यावर पण व्हायला पाहिजे, असा टोलाही रोहित पवार यांनी वळसे-पाटील यांना लगावला आहे.