निवडणूक आयोग सुपारीबाज संस्था, संजय राऊत यांची टीका

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि घडय़ाळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निर्णयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. जे शिवसेनेच्या बाबतीत झाले तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडेल. निवडणूक आयोगाने लोकाहीच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आणि लोकशाहीची पूर्ण हत्या करण्यासाठी हे प्रकरण राहुल नार्वेकरांकडे सोपवले आहे. हा लोकशाहीचा वध असून निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष दोघे मिळून तो करत आहेत असे राऊत यांनी म्हटले.

निवडणूक आयोगाच्या गळ्यात मोदी शहांचा गुलामीचा पट्टा आहे आणि हातात लोकशाहीचा खून करण्यासाठी हत्यार आहे. निवडणूक आयोग ही एक सुपारीबाज संस्था आहे. मोदी शहांची सुपारी घेऊन राजकीय पक्षांमध्ये फूट पाडणाऱ्यांना ती प्रोत्साहन देत आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली. राऊत यांनी म्हटले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि अजित पवारांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले. तोच पक्ष मोदी आणि शहांनी अजित पवारांना दिला आणि अजित पवारांना आपल्या पक्षात घेतले. ही आपल्या देशाच्या लोकशाहीची, निवडणूक आयोगाची शोकांतिका आहे. निवडणूक आयोग हा भारतीय निवडणूक आयोग राहिलेला नसून तो मोदी शहांचा निवडणूक आयोग झाला असल्याने महाराष्ट्राच्या बाबतीत असे निर्णय घेतले गेले. कारण या दोन्ही नेत्यांचा महाराष्ट्रावर राग आहे, त्यांना महाराष्ट्रावर सूड घ्यायचा, मराठी माणसाचा बदला घ्यायचा आहे हे स्पष्ट दिसत आहे.” चोऱ्या-माऱ्या करून, पक्ष चोरून तुम्हाला राजकारण करायचे असेल तर हे तात्पुरते राजकारण आहे. आज एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे भाजपवाले अभिनंदन करत आहेत. लक्षात घ्या उद्या याच पद्धतीने तुमचा पक्ष तुमच्या हातातून जाऊ शकतो. आज मोदी-शहांची गॅरेंटी ही तात्पुरती गॅरेंटी आहे. उद्याचा काळ हा अत्यंत भयंकर आहे आणि भाजपला याचे परीणाम भोगावे लागतील, असा इशारा राऊत यांनी दिला.

राज्यसभेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा विचार

दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा विचार सुरू असून त्यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवावे अशी महाविकास आघाडी भूमिका असल्याचे म्हटले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अन्य पक्ष मिळून 32 मते आहेत, महाविकास आघाडीला 8 मते कमी पडत आहेत. आपण शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो अशा वेळी आपण यावेळी शाहू महाराजांना पाठवता येईल का राज्यसभेवर आणि या विचारांचा वारसा बळ देता येईल का यासंदर्भात आम्ही चर्चा करत आहोत असे राऊत यांनी म्हटले.